सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात होणारा ड्रायपोर्ट कायमसाठी स्थगित करण्यात आलेला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने तसा खुलासा माहिती अधिकारात केला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्याचे काय झाले याची विचारणा मी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे केली होती. त्यावर खुलासा केला आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) चा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार एप्रिल २०१८ करण्यात आला. सांगली येथील ड्राय पोर्टच्या विकासासाठी भूसंपादन आणि जेएनपीएला मदत करण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ला जमीन अधिग्रहण साठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून नामांकित केले.
ड्रायपोर्ट स्थापनेसाठी ५ नोव्हेंबर २०२० रोजी महसूल मंत्रालय, वित्त मंत्रालय, सीबीआयसी विभाग (सीबीआयसी) द्वारे आयसीडी/सीएफएस/एएफएस स्थापन करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सध्या भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यात आली होती. .
कलम ४.१.२ अन्वये, सीमा शुल्क विभागाने आयसीडीची विद्यमान संख्या आणि भविष्यातील आवश्यकतेच्या आधारावर राज्यांचे झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्राचे रेड झोन (अस्तित्वात असलेल्या मोठ्या संख्येने आयसीडी) अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे. आणि म्हणून असे नमूद केले आहे की महाराष्ट्रात कोणत्याही नवीन आयसीडी/सीएफएस (ड्राय पोर्ट) ला परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान खासदार संजय पाटील यांनी मुंबई मंत्रालयात नुकतीच ड्रायपोर्ट उभारण्याबाबत बैठक घेतली. त्यात सलगरे येथे जागा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले होते . जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने हा खुलासा केल्यामुळे आता जिल्ह्यात ट्रायपोर्ट होणार का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.