सांगली

Dr. Smita Yogesh Jadhav: ५८ तालुक्यांत स्पर्धा परीक्षा केंद्र आणि AI डिजिटल लॅब उभारणार : डॉ. स्मिता जाधव

Pune Graduate Constituency Election : विट्यात महायुतीचा मेळावा; डॉ. स्मिताताई जाधव यांच्याकडून ९ संकल्पांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Smita Yogesh Jadhav News

विटा : ‘पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कल्याणासाठी दिलेली सर्व वचने पूर्ण करण्यासाठी मी २४ तास कटिबद्ध राहीन,’ अशी ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांनी दिली.

येथील आदर्श इंजिनिअरिंग कॉलेजच्या संकुलात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचारार्थ विशेष बैठक पार पडली. या वेळी भाजप नेते वैभव पाटील, शरद लाड, प्रमोद भारते, शेखर इनामदार, विलास काळेबाग, संग्राम माने, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, तेजस्विनी दुर्गे, पूजा पाटील, पी. टी. पाटील, सुभाष धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. स्मिताताई जाधव म्हणाल्या, ‘गेली १९ वर्षे पुढारी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. तसेच गेल्या २५ वर्षांपासून पुढारी परिवार आणि टोमॅटो एफएम, आपलं एफएमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम आम्ही करत आहोत. नवरात्रीच्या या मुहूर्तावर मी केवळ आश्वासने नाही, तर ९ वचनांचा संकल्प घेऊन जनतेसमोर येत आहे.’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक तालुक्यात कौशल्य विकास केंद्र आणि एआय (AI) डिजिटल लॅब उभारणे, शेतकरी पुत्रांना उद्योजक बनवण्यासाठी इन्क्युबेशन व रिसर्च सेंटर स्थापन करणे, एमपीएससी-यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८ तालुक्यांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, तसेच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग व पोर्ट मॅनेजमेंटसारख्या नव्या करिअर संधींची माहिती देणारी दालने उभारणे ही आमची प्राथमिकता असेल. महिलांसाठी स्वतंत्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे उभारली जातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर ३ महिन्यांनी आमच्या कामाचा लेखाजोखा डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहीर केला जाईल. ज्येष्ठ बंधू शरदभाऊ लाड यांनी या बहिणीला दिलेला आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचे कष्ट मला बळ देणारे आहेत. हा कष्टकऱ्यांचा लढा असून, जनतेसाठी अहोरात्र काम करण्यास मी सज्ज आहे.’

१४ हजार पदवीधरांचे मतदान खेचून आणणार : वैभव पाटील

भाजप नेते वैभव पाटील म्हणाले, ‘आमच्या शैक्षणिक संस्थेत १४ हजार विद्यार्थी शिकत असून, त्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुली आहेत; तसेच ७०० कर्मचाऱ्यांमध्येही महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे महिला उमेदवाराबाबत एक विशेष आत्मीयता आहे. आम्ही आतापर्यंत साडेसात हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी केली असून हा आकडा १४ हजारांपर्यंत जाईल. या मतदारांचे अ, ब आणि क अशा गटांत वर्गीकरण करण्यात आले असून, १३ तारखेपर्यंत पडताळणी पूर्ण करून १४ तारखेला अंतिम यादी समन्वयकांकडे दिली जाईल. खानापूर विधानसभा मतदारसंघातील ही सर्वच्या सर्व मते महायुतीच्या पारड्यात पाडण्याचा शब्द आम्ही देतो.’

या बैठकीस सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्राध्यापक संघटना, सिनेट सदस्य, विद्यापीठ विकास आघाडीचे पदाधिकारी, सर्व आजी-माजी नगरसेवक तसेच महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT