येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ तर्फे काॅ. डी राजा यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित करताना भालचंद्र कांगो, प्रा. विलासराव पाटील, ॲड. सुभाष पाटील, सुभाष पवार , ॲड.नानासाहेब पाटील, इंद्रजीत पाटील , स्मिता पानसरे, तानाजी ठोंबरे आदी. 
सांगली

D Raja | जंतर मंतरवरच्या आंदोलनामागे कम्युनिस्ट पक्षाचाच विचार : कॉम्रेड डी. राजा, क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार राजा यांना प्रदान

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते डी. राजा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

पुढारी वृत्तसेवा

विटा : जे सरकार राष्ट्रीय शिक्षणावर दोन टक्के सुद्धा पैसे खर्च करत नाही अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, म्हणून तर जंतर मंतरवरचे आंदोलन झाले. ही जेन झी पिढी स्वतः च्या हक्कासाठी प्रचंड जागरूक असून त्यामागे कम्युनिस्ट पक्षाचाच विचार आहे,असा दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महा सचिव कॉम्रेड डी. राजा यांनी केला.

येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठा च्यावतीने यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डी राजा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कॉम्रेड डी.राजा बोलत होते. यावेळी प्रा. विलासराव पाटील अध्यक्षस्थानी होते. सुभाष लांडे , कॉम्रेड ॲड. सुभाष पाटील, लोकविद्यापीठाचे अध्यक्ष सुभाष पवार, भाई संपतराव पवार , प्रा. पांडु रंग शितोळे, प्रा. बी.बी.लगारे व्यासपीठावर उप स्थित होते.

कम्युनिस्ट तत्वज्ञान हे शोषितांचे, समतेचे आणि माणसाला मान देणारे

कॉम्रेड डी. राजा म्हणाले," क्रांतिसिंह नाना पाटलांनी जमीनदारीविरुद्ध, शेतकऱ्यांसाठी मोठा संघर्ष केला. ते क्रांतीकारकांचे महामेरू होते आणि ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते याचा पक्षाला सार्थ अभिमान आहे. कम्युनिस्ट तत्वज्ञान हे शोषितांचे, समतेचे आणि माणसाला मान देणारे तत्वज्ञान आहे. नफ्याच्या मागे लागणे हे भांडवलशाहीचे लक्षण आहे, तर माणसाच्या मागे लागणे हे कम्युनिस्ट विचारांचे लक्षण आहे. देशाची इकॉनॉमी तिसरी करणे हे जरी महत्त्वाचे असले, तरी माणसाचा विचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे.त्यासाठी माणसाच्या स्वाभिमान टिकला पाहिजे. १९६८ च्या कोठारी आयोगाने बजेटच्या ६% रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची शिफारस केली होती, परंतु प्रत्यक्षात आज केवळ २% ते ३% रक्कमच खर्च केली जात आहे.

जे सरकार राष्ट्रीय शिक्षणावर दोन टक्के सुद्धा पैसे खर्च करत नाही अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, या विचाराने प्रेरित होऊन जंतर-मंतरवरचे आंदोलन झाले. या आंदोलना मागे कम्युनिस्ट विचार आहे. देशभरात चळवळ आणि आंदोलन हे केवळ कम्युनिस्टच करू शकतात. आजच्या काळात नीट परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालक १ लाख ३२ हजार रुपयांपर्यंतचा खर्च करतात, तर भारत सरकार संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर १ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च करते. त्यामुळे शिक्षण पूर्णपणे खाजगीकरणाच्या विळख्यात अडकले असून, त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.आज देशात फॅसिस्ट राजवट सुरू असून, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली समाजात संकुचित ता पसरवली जात आहे. माणसा- माणसामध्ये भेद निर्माण करून एकमेकांचे शत्रू बनवण्याचे प्रकार सुरू आहेत, त्याचा आम्ही तीव्र विरोध करतो.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कर्मभूमी येताना मला विशेष आनंद होत आहे. त्यांचे कार्य अनेकांना उर्जादायी आहे. माझ्या शिक्षिका व आईच्या प्रेरणेमुळे मला शिक्षण घेता आले. दिल्ली मध्ये जंतर - मंतर वर तब्बल ३६ दिवस आंदोलन झाले. त्या आंदोलनामुळे लोकांच्या मनात भाजपा विषयी असलेली भीती दूर झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका जातीचे नाहीत. तर समग्र समाजाचे आहेत. हे आंदोलनातून सिध्द झाले आहे. हे महत्त्वाचे आहे. शिक्षण हे समाज बदलाचे एकमेव साधन आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षांची परंपरा आहे. पक्ष संपणार नाही. तो आगामी काळात अधिक सक्षम करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे सांगत आपल्या पक्षाचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.या वर्षात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा मला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डी. राजा यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात ॲड. सुभाष पाटील म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजातील उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी अनेक आंदोलने केली. त्यांच्या कार्याची भावी पिढीला प्रेरणा मिळावी. यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुरस्काराचे आयोजन केले जाते. यावेळी डी राजे यांनी संपूर्ण भाषण इंग्रजीतून केले त्याचे सुलभ भाषांतर कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी केले तसेच प्रा. विलासराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ॲड. नानासाहेब पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. मुख्याध्यापक विजय महिंद यांनी आभार मानले. यावेळी काॅ. बन्सी सातपुते , स्मिता पानसरे, विजय बचाटे, काॅ‌. तानाजी ठोंबरे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार, व्ही.वाय. पाटील , रमेश सहस्त्रबुद्धे, निखिल सुतार, वैभव पवार यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सत्कार

शाहू पाटील, अक्षरा गुरव, सई शिंदे, शशि जाधव , स्नेहा खताळ, आर्या सय्यद, कांबळे, कृष्णदेव टकले, तेजश्री कदम , यासह अन्य विद्यार्थ्यांचा काॅ. डी.राजा यांच्या विशेष हस्ते सत्कार करण्यात आला.

चिमुकल्या शाहूचा विशेष सत्कार

शाहू इंद्रजीत पाटील या सहा वर्षीय चिमुकल्याचा डी राजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाहू ने सिंहगडावर न थकता ट्रेकिंग केले. त्याबद्दल विशेष सन्मान केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT