

सांगली : महापालिकेच्या परिवहन समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक प्रकाश पाटील, तर प्रभाग समिती क्रमांक चारच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका शिरीन पिरजादे यांनी बुधवारी अर्ज दाखल केले. विरोधी काँग्रेसकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पाटील व पिरजादे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. मात्र अधिकृत घोषणा शुक्रवारी निवडणुकीच्या विशेष सभेत होणार आहे. परिवहन समिती सभापतीपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता, मात्र भाजपने तो अमान्य केला. परिवहन समिती भाजपकडे राहणार आहे.
महापालिकेच्या परिवहन व प्रभाग समिती चारच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार, दि. ५ ऑगस्ट हा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीकडून दोन्ही समितीवर कोणाची वर्णी लागणार, याकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीने परिवहन सभापतीपदावर हक्क सांगितला होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. भाजप व राष्ट्रवादीतील चर्चेनंतर ही समिती भाजपकडे राहिली आहे.
भाजपकडून कुपवाडमधील नगरसेवक प्रकाश पाटील यांनी परिवहन समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभापती निवडणुकीसाठी दि. ७ ऑगस्टरोजी समिती सभा होणार आहे. एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला असला तरी उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज माघारीची औपचारिकता दि. ७ ऑगस्टरोजी पूर्ण झाल्यानंतर बिनविरोध निवड जाहीर होईल.
परिवहन समिती १३ सदस्यांची आहे. त्यात काँग्रेसचे संख्याबळ ३ आहे. प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये एकूण २२ नगरसेवक आहेत, त्यातही काँग्रेसचे संख्याबळ ४ आहे. या दोन्ही समित्यांमध्ये काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या दोन्ही समितींच्या सभापतीपदासाठी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.