तासगाव; पुढारी वृत्तसेवा : दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या 'सावळजमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा' या बातमीची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. सावळज गावातील ग्रामस्थांना अजूनही गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गढूळ पाण्यामुळे साथीच्या आजाराचा फैलाव झाल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार असेल, असा इशारा सावळज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीस लेखी पत्राद्वारे दिला आहे.
आरोग्य अधिका-यांनी ग्रामपंचायतीस पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, सावळज गावभागामध्ये गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. २४ फेब्रुवारीला 'दैनिक पुढारी' मध्ये गढूळ पाणी पुरवठा होत असल्याची बातमी प्रसिद्ध होऊनही आपल्याकडून योग्य त्या उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत, असे दिसते. अजूनही गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गावात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची शक्यता नाकारता येत नाही. तरी टीसीएल आणि तुरटीचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने जलशुद्धी करुनच गावाला पाणी पुरवठा करावा, ग्रामस्थांच्या आरोग्याशी संबंधित अशा गोष्टीकडे गांभिर्याने पहावे. याकडे दुर्लक्ष केल्यास आणि गावात साथीच्या आजारांचा फैलाव झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत असेल, असेही या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा :