खासदार विशाल पाटील  Pudhari File Photo
सांगली

खासदार, आयुक्तांच्या उपस्थितीत काँग्रेस नगरसेवकांची गार्‍हाणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली, पुढारी वृत्तसेवा : खासदार विशाल पाटील व महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शुक्रवारी प्रभागातील समस्यांची अनेक गार्‍हाणी मांडली. निविदा प्रक्रिया होऊनही कार्यारंभ आदेश दिले जात नसल्याने प्रभागातील विकासकामे रखडली असल्याकडे खासदार व आयुक्तांचे लक्ष वेधले. दरम्यान, विकासकामे गतीने मार्गी लावली जातील, असा विश्वास आयुक्त गुप्ता यांनी दिला.

खासदार पाटील यांनी शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. माजी महापौर किशोर जामदार, माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, हणमंत पवार, उत्तम साखळकर, माजी सभापती संतोष पाटील, अभिजित भोसले, फिरोज पठाण, रोहिणी पाटील, वहिदा नायकवडी, मनोज सरगर, विजय घाडगे, प्रशांत पाटील, मयूर पाटील, प्रकाश मुळके, वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, रवींद्र वळवडे, आरती वळवडे यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसवेक उपस्थित होते.

मंजूर असलेली व निविदा प्रक्रिया झालेली कामे सुरू न होणे, स्वच्छता, औषध फवारणी, रस्ते पॅचवर्क, ड्रेनेजची रखडलेली कामे, मोकाट जनावरे आदी प्रश्नांकडे माजी नगरसेवकांनी लक्ष वेधले. पावसाळी मुरूम तातडीने टाकावा, अशी मागणी केली. वारणाली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उर्वरित काम गतीने पूर्ण व्हावे, विशेषज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांची भरती करावी, अशी मागणीही झाली.

करारानुसार समुद्रा कंपनीकडे महापालिकेचे 20 कर्मचारी काम करत आहेत. त्यांना कंपनीकडून सापत्न वागणूक मिळत आहे. अतिरिक्त काम लावले जात असल्याची तक्रारही काही नगरसेवकांनी केली. त्यावर आयुक्त गुप्ता यांनी, या कर्मचार्‍यांबाबत कंपनीला जाब विचारला जाईल, असे सांगितले. करारानुसार हे कर्मचारी कंपनीला दिले असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

शामरावनगर येथील साचणार्‍या पाण्याबाबत चर्चा झाली. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटअंतर्गत 476 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. सर्व प्रभागात स्वच्छतेसाठी समान कर्मचारी नियुक्त केले जातील. रस्ते, ड्रेनेज आदी कामांचे रजिस्टर घातले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी नगरसेवकांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार विशाल पाटील यांनी गुप्ता यांना केली.

ड्रेनेज योजना डिसेंबरपर्यंत पूर्ण

सांगली ड्रेनेज योजनेचे काम डिसेंबर 2024 अखेर पूर्ण होईल. तशा कडक सूचना ठेकेदारास दिल्या आहेत. रोजच्या रोज कामाच्या प्रगतीवर मी स्वत: लक्ष ठेवून आहे. मिरज ड्रेनेज योजनाही गतीने मार्गी लागेल, अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT