सांगलीत पूरक्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा File Photo
सांगली

सांगलीत पूरक्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगलीत सोमवारी रात्री साडेआठ वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 27 फूट 5 इंच होती. पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता असून पूरक्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाकडून सूचना मिळताच स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली.पूरक्षेत्रातील निवासी भागात सोमवारी रात्रभर अग्निशमन व आणीबाणी सेवेच्या अधिकार्‍यांनी गस्त घातली. पाणी पातळी वाढल्यास मंगळवारी काही कुटुंबांचे स्थलांतर होईल. महापालिकेने निवारा केंद्रे सज्ज ठेवली आहेत.

महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सोमवारी कृष्णा व वारणा पाणलोट क्षेत्रातील पाऊस व संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला. सांगलीत कृष्णा नदीकाठच्या पूरबाधीत क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोडवरील शिव मंदिर परिसर, काकानगर, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनीमधील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार पाणी पातळी वाढल्यास तातडीने स्थलांतरित व्हावे. पाणी पातळी 28 फुटाच्या पुढे गेल्यास स्थलांतरित व्हावे, असे आवाहन केले आहे.

निवारा केंद्रे सज्ज

सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी 30 फुटापर्यंत गेल्यावर सूर्यवंशी प्लॉटमध्ये रहिवासी भागात पुराचे पाणी येते. ही बाब लक्षात घेऊन पूरबाधीत रहिवाशांचे महापालिका शाळा नंबर 3 व शाळा नंबर 17 (हिंदू-मुस्लिम चौक) याठिकाणी निवारा केंद्रात स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे. जनावरांसाठी बदाम चौक, फिश मार्केटशेजारील मैदान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील सम्राट व्यायाम मंडळाचे मैदान उपलब्ध केले जात आहे.

महापालिकेची वॉर रूम 24*7 कार्यरत

आयुक्त गुप्ता म्हणाले, पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीपात्रात पाणी पातळी वाढत आहे. महापालिका प्रशासनाने संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी-सुविधांसह सतर्क आहेत. एनडीआरएफचे पथक आणि महापालिका अग्निशमन दल अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे. महापालिकेची वॉर रूम चोवीस सात कार्यरत आहे. पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे. स्थलांतरावेळी सोबत घ्यावयाची महत्त्वाच्या साहित्याची यादी महापालिका प्रशासनाने यापूर्वी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्यासोबत अत्यावश्यक साहित्य घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या निवारा केंद्रात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे, असे आवाहन शुभम गुप्ता यांनी केले.अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ म्हणाले, प्रशासनाने पूरबाधीत रहिवाशांचे महापालिकेच्या निवारा केंद्रांमध्ये गरजेनुसार स्थलांतर करण्याची व्यवस्था केली आहे.

मदतीसाठी संपर्क नंबर...

पूरस्थिती, आपत्तीत मदतीसाठी 70 660 40 330, 70 660 40 331, 70 660 40 332 हे संपर्क नंबर रात्रंदिवस सुरू असणार आहेत. नागरिकांनी या संपर्क नंबरवरून संपर्क साधून आपत्ती काळात आवश्यक ती मदत उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT