आष्टा : पुढारी वृत्तसेवा
आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर गोटखिंडी फाट्याजवळ नायरा पेट्रोल पंपासमोर शनिवारी पहाटे शिवशाही एस. टी. बस व डंपर यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बसमधील एक महिला किरकोळ जखमी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आष्टा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवार, दि. 7 रोजी या अपघातातील स्वारगेट-मिरज ही शिवशाही एस. टी. बस (क्र. एम. एच. 09 ई. एच. 1538) इस्लामपूरकडून सांगलीकडे निघाली होती तर पेठ-सांगली महामार्गाच्या कामावर खडी, मुरूम वाहतूक करणारा डंपर (क्र. आर. जे. 14 जी. आर. 1016) हा खडी खाली करून सांगलीकडून इस्लामपूरकडे निघाला होता. दरम्यान, पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास गोटखिंडी फाट्याजवळ पेट्रोल पंपासमोर बस व डंपर यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात बसमधील एक महिला किरकोळ जखमी झाली.