बैलगाडी शर्यत 
सांगली

Bailgada Sharyat :भरपाई कोण देणार? कारवाई होणार का?

बैलगाडी शर्यतीचे कवित्व ः मृत, जखमी, शेतकऱ्यांना वाली कोण ?

पुढारी वृत्तसेवा

सांगली : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी (दि. 9) परंपरेच्या नावाखाली झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यती सरते शेवटी तांडव केसरी ठरल्या. मैदानावरील शर्यती परंपरा नव्हे, तर संघटित अनास्थेचे प्रदर्शन होत्या. शर्यतीदरम्यान नियंत्रण सुटलेल्या एका वेगवान बैलगाडीने पाठीमागून धडक दिल्याने अंबाजी शेखू चव्हाण (वय 60, रा. बुद्देहाळ, ता. सांगोला) या शर्यत शौकिनाचा मृत्यू झाला. या मृत्यूची भरपाई कोण करणार, याचा पुकारा आयोजकांनी केला नाही.

शर्यत मैदानावर जमा झालेल्या प्रचंड गर्दीत अनेकदा बैल उधळल्यामुळे गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लहान मुले आणि शौकिनांची धावपळ झाली. धक्कादायक बाब म्हणजे दिवसभरात 400 ते 500 लोक किरकोळ ते मध्यम जखमी झाले आणि त्यापैकी 150 ते 200 अल्पवयीन मुलेही होती. परंतु इतक्या मोठ्या गर्दीसाठी प्रथमोपचार केंद्रसुध्दा उभारले नाही. जखमींना पाण्याचा ग्लास तरी देण्याची तसदी आयोजकांनी घेतली नाही. सर्व जखमींचा उपचारांचा खर्च कोण उचलेल, हा प्रश्न सध्या उत्तराविना आहे.

प्राणी क्लेश विरोधी समिती असते, ती या शर्यतीवेळी कोठे होती? त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली का? बैलगाड्या का उधळल्या? बैलांना मारले जात होते का? बैलांच्या शेपट्या मुरगाळल्या जात होत्या की नाही ? याबाबत कोणी अहवाल तयार करणार का? उपलब्ध व्हिडिओ पुरावे म्हणून संकलन करून संबंधितांवर कारवाई करणार का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आदी यंत्रणा देणार आहेत का?

शर्यतीच्या नियमांचे किरकोळ उल्लंघन झाले तरी, तत्परतेने कारवाई करणारे महसूल आणि पोलिस विभाग या दुर्घटनेत मात्र मौनात गेले आहेत. कोणतीही चौकशी नाही, कोणताही पंचनामा नाही, कोणतीही पोलिस कारवाई नाही. एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला असूनही प्रशासनाची प्रतिक्रिया शून्य आहे. हे मौन म्हणजे निष्क्रियता, की आयोजकांशी असलेले संगनमत? असा सवाल उपस्थित होत आहे.

बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बैलगाड्यांच्या शर्यतीत एकाचा बळी गेला आणि अनेकजण जखमी झाले. ही घटना एक अपघात आहे. याकडे अपघात म्हणूनच पाहिले पाहिजे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे. बैल उधळले आणि हा अपघात झाला. याला कोणी कारणीभूत आहे, असे म्हणता येणार नाही. अर्थात थोडी काळजी घेणे आवश्यक होते, त्याचबरोबर याचे चांगले नियोजन करणे आवश्यक होते. बैलगाड्यांच्या शर्यती ही एक स्पर्धाच नव्हे, तर यामुळे चांगल्या जनावरांचे जतन होते, शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होते.
रघुनाथदादा पाटील, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना.
बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयात परवानगी मिळाल्यानंतर शर्यतींचे प्रमाण वाढत आहे. मात्र नियोजनबध्द शर्यतीचे आयोजन केले जात नाही. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. खरे तर बैलाचा उपयोग शर्यतीसाठी करणे चुकीचे आहे. शर्यतीमुळे दुर्घटना घडतात. त्याशिवाय त्या प्राण्यांनाही त्रास होतो. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी घालायला हवी
सुधाकर पाटील, शेतकरी, कवलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT