मौजे डिग्रज : मौजे डिग्रज ते ब्रह्मनाळ रस्त्यावरील पुलाच्या कामास दिरंगाईच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करताना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, सरपंच तानाजी आंबोळे व शेतकरी Pudhari Photo
सांगली

पुलाच्या कामास दिरंगाईविरोधात बोंबाबोंब आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कसबे डिग्रज : पुढारी वृत्तसेवा

मौजे डिग्रज येथील मौजे डिग्रज ते ब्रह्मनाळ रस्त्यावर पूल व दीड कि.मी.चा रस्ता यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलासाठी अडीच व रस्त्यासाठी साडेतीन कोटी असे सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र वर्षभरापासून पुलाचे काम रखडले आहे. त्याचा निषेध म्हणून स्वतंत्र भारत पक्ष व मौजे डिग्रज येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन केले.यावेळी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराबाबत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पुलाच्या मार्गात अडथळा करणारे विद्युत खांब आठ दिवसांत न हटविल्यास ग्रामस्थांच्या वतीने हे खांब जबरदस्तीने हटविले जातील, असा इशारा देण्यात आला.

या पुलाच्या मार्गामध्ये दोन्ही बाजूला 5 ते 6 विद्युत खांब उभे आहेत. त्यातील काही खांब पुलाच्या बांधकामामध्येच येत आहेत. हे खांब इतरत्र हलविण्यात यावेत यासाठी मौजे डिग्रजमधील शेतकर्‍यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, खांब हलविण्याबाबतचा प्रस्ताव महावितरणकडे दिल्याचे सांगण्यात येते. हा प्रस्ताव कंपनीच्या कोल्हापूर विभागामध्ये पडून असल्याचे दिसून येते. पुलाचे काम सुरू होऊन वर्ष झाले. वास्तविक पुलाचे काम सुरू होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली व महावितरण यांनी हे खांब इतरत्र हलविणे गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाठपुरावा करीत नाहीत. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

यावेळी सरपंच तानाजी आंबोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, राजू आवटी, सुभाष पाटील, विजय पाटील, आप्पासाहेब पाटील, अरविंद पाटील, महावीर पाटील-ढंग, शरद पाटील, आशिष मगदूम, बाळासाहेब चौगुले, अशोक परीट यांच्यासोबत शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकर्‍यांना होतोय त्रास : फराटे

महावितरणकडे प्रस्ताव पाठवूनही या विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांच्या वादामध्ये हे विद्युत खांब हलविण्याचे काम वर्ष होऊन गेले तरी तसेच पडून आहे. त्यामुळे पुलाचे काम रेंगाळले आहे. या सर्व गोष्टींचा त्रास शेतकर्‍यांना होत आहे. वारंवार विचारणा करूनही दोन्ही विभाग दुर्लक्ष करत असल्याचे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT