Sangli blast
सांगली : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला असून यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या शक्तिशाली स्फोटाचे परिसरात पाच किलोमीटरपर्यंत हादरे बसले. आसपासच्या गावातील वाहनांच्या व घराच्या काचा देखील फुटल्या आहेत.
भाळवणी येथे शोभेच्या दारूचा हा स्फोट झाल्याचं समोर आले आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की भाळवणीसह आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात जमीन हादरली. तसेच आसपासच्या गावातील वाहनांच्या आणि घराच्या काचांना तडे गेले. या स्फोटामध्ये आफताब मन्सूर मुल्ला आणि अमीन मुल्ला हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाने फटाका निर्मिती व शोभेच्या दारू निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी दोन अग्निशमन दलाची वाहने सध्या घटनास्थळी दाखल झाली आहेत. या भीषण स्फोटामुळे सांगली जिल्हा हादरून गेला आहे.