

विटा : निष्काळजीपणे भरधाव गाडी चालवली आणि त्यामुळे अपघात होऊन दोन जणांच्या मृत्यूला आणि तिघांच्या जखमी होण्याला कारणीभूत ठरलेल्या चालक दिपक सातप्पा रानमाळे (वय ४०, रा. मांगेवाडी ता.राधानगरी,जि कोल्हापूर) यास विटा न्यायालयाने वर्षभर तुरुंगाची हवा खाण्याची शिक्षा सुनावली आहे. येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पल्लवी सुर्यवंशी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. नऊ वर्षांपूर्वी हा अपघात घडला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, १६ मे २०१६ रोजी विट्याच्या मायणी रस्त्यावरील लकडे पेट्रोलपंपाजवळ एक स्विफ्ट गाडी आणि दोन मोटरसायकल यांच्यात अपघात घडला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील मांगेवाडी येथील दीपक रानमळे हा स्विफ्ट गाडी चालवत भरधाव वेगाने मायणीकडून विट्याकडे येत होता. त्यावेळी समोरच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याची स्विफ्ट गाडी विरुद्ध दिशेला आली आणि त्याचक्षणी लकडे पेट्रोल पंपा कडून पेट्रोल भरून येत असलेल्या राजेंद्र गणपती माळी (वय ४५) व सुरज राजेंद्र माळी (वय १८) (दोघेही रा. माहुली ता. खानापूर जि. सांगली) यांच्या होंडा गाडीला जोरदार धडक दिली. तसेच नियंत्रण झाल्यामुळे त्यामागून येणाऱ्या दुसऱ्या होंडा गाडीलाही स्विफ्ट गाडीने कट मारला. या दुसऱ्या होंडावर खानापूर तालुक्यातील देविखिंडी येथील जोडपे विशाल अशोक सवणे आणि पत्नी सौ तेजस्विनी सवने हे बसले होते. त्यांनाही जखमी केले होते.
दरम्यान अपघातानंतर तात्काळ राजेंद्र माळी आणि सुरज माळी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात तिन्ही गाड्यां चेही मोठ्या नुकसान झाले होते. याबाबत विटा पोलिसांमध्ये १७ मे २०१६ रोजी उपनिरीक्षक संभाजी सिंध्दु महाडीक यांनी फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार भारतीय दंड विधान कलम २७९,३०४ अ,,३३८,४२७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४,१४६/१९६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. हा अपघात स्विफ्ट चालकाच्या म्हणजे दीपक रानमळे यांच्या निष्काळजीपणे आणि बेदरकार गाडी चालवण्यामुळेच झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. तपास पूर्ण झाल्यानंतर विटा न्यायालयात संबंधित चालक दीपक रानमळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन १७ नोव्हेंबर २०२५ रोजी विट्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पल्लवी सुर्यवंशी यांनी या गुन्हयातील आरोपी दीपक रानमळे यास दोषी ठरवण्यात आले. त्यास भादविस कलम ३०४ (अ) मध्ये १वर्ष साधी कैद व वीस रुपये दंड, दंड न भरलेस सहा महिन्याची साधी कैद, भादविस कलम २७९ मध्ये 3 महिने साधी कैद व पाचशे रुपये दंड, दंड न भरलेस ७ दिवसांची साधी कैद, भादविस कलम ३३७ मध्ये एका महिन्याची साधी कैद व पाचशे रुपये दंड, दंड न भरलेस ७ दिवसांची साधी कैद तसेच भादविस कलम ४२७ मध्ये एका महिन्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड, दंड न भरलेस आणखी दोन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी अभियोक्ता म्हणून शारदा गायक वाड तर विटा पोलीस ठाण्याचे हवालदार गणी पठाण यांनी कोर्ट पैरवी केली. दरम्यान, खाना पूर तालुक्यातील एखाद्या अपघाताच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. लोकांनी कायद्याचे पालन करून काळ जीपूर्वक वाहने चालवावीत असे आवाहन विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे केले आहे.