सांगली : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपचा निवडणूक माहोल जोरात आहे. या प्रभागातील भाजपचे लक्ष्मण नवलाई, मालन गडदे, गीतांजली ढोपे-पाटील व प्रशांत पाटील हे चारही उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. महापौर भाजपचाच होईल. केंद्र, राज्य व महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 17 मधील अ- गटातील उमेदवार लक्ष्मण शिवराम नवलाई, ब- गटातील उमेदवार मालन दत्तात्रय गडदे, क- गटातील उमेदवार गीतांजली राहुल ढोपे-पाटील, ड-गटातील उमेदवार प्रशांत जिनगोंडा पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सायंकाळी झाले.
आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजप नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, सिध्दार्थ गाडगीळ, ज्येष्ठ उद्योजक मनोहर सारडा, शांतिनाथ कांते, प्रभाग निवडणूक प्रभारी सुनील माणकापुरे, काँट्रॅक्टर मोहन जंगम, सचिन बावडेकर, माजी महापौर गीताताई सुतार, नितीन तावदारे, राजेश साबणे, आर. बी. पाटील, प्रशांत सावर्डेकर, सुहास पाटील, अशोक घोरपडे, राजेंद्रसिंह पाटील, दलितमित्र अशोक पवार, अमोल आंबोळे, आर. के. स्वामी, मुकुंद काळे, उज्ज्वला चौधरी, अरुणा बाबर, ईशा साठे, ॲड. विलास बेले, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. गाडगीळ म्हणाले, प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपचे वातावरण चांगले आहे. महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीतही या प्रभागात भाजपला मोठे यश मिळाले होते. लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, गीतांजली ढोपे-पाटील यांनी या प्रभागात अनेक विकास कामे केली. या प्रभागात पुन्हा भाजपचा माहोल तयार झाला आहे. नागरिकांनी भाजपला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. शेखर इनामदार म्हणाले, हा प्रभाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे. या परिसरात पाच वर्षांत चांगले काम झाले आहे. केंद्र, राज्यातील भाजप सरकार व महापालिकेच्या माध्यमातून विकास योजना, प्रलंबित कामांसाठी मोठा निधी मिळाला. अनेक नागरी सुविधा निर्माण झाल्या. यावेळीही या प्रभागातील भाजपचे चारही उमेदवार निवडून येतील.