

सांगली : काहीजण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची दिशाभूल करून आपल्याला हवे तसे वक्तव्य करून घेत आहेत. नुकतेच पालकमंत्र्यांनी 22 तिकिटे देणार असल्याचे सांगितले. परंतु, नव्याने केवळ सहा नगरसेवकांनी भाजपप्रवेश केला असताना महानगरपालिका निवडणुकीत 22 तिकिटे कोणाला देणार आहात, असा प्रश्न आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांनी बुधवारी पत्रक प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्री पाटील यांनी दिवाळीमध्ये भाजप नेत्या जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. जयश्री पाटील समर्थक माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते, कार्यकर्त्यांकडून वक्तव्ये सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार गाडगीळ यांचे पत्रक आलेले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणसज्जता सुरू केली आहे. भाजपसाठी प्रामाणिक काम करणार्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला वार्यावर सोडले जाणार नाही. पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे. अशा वेळी काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण निष्ठावंत व दिवसरात्र राबणार्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. मी तीन वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. भाजपच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आमदार गाडगीळ यांनी पत्रकात म्हटले आहे.
गत महापौर निवडणुकीत भाजपचे काही नगरसेवक फुटले. त्यामुळे पक्षाचा पराभव झाला. त्यांनी आपली चूक मान्य करून विधानसभा निवडणुकीत भाजपचेच काम केले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कोणी कोणी काम केले आहे, त्याचाही लेखा-जोखा पक्षाच्या वरिष्ठांकडे मी सादर करणार आहे, असा इशाराही आमदार गाडगीळ यांनी दिला आहे.