जत; पुढारी वृत्तसेवा : जत शहरात एकही स्वतंत्र महिला स्वच्छतागृह नाही. स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी भाजी विक्रेत्या महिलांकडे भीक मागून होणारा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनीऑर्डरने पाठवण्यासाठी विक्रम ढोणे यांनी भिकमाग आंदोलन केले. या अनोखे व हटके आंदोलनाचे जत तालुक्यात चर्चा सुरू आहे.
यावेळी ढोणे म्हणाले, गेली पाच वर्षे आम्ही शहरात स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला निवेदन देतो, आंदोलन करतो. नगरपालिकेत महिला नगराध्यक्ष आणि ५०% महिला प्रतिनिधी असतानाही शहरात एकही स्वतंत्र महिला स्वच्छतागृह नाही. हे समस्त महिला भगिनिंचे दुर्दैव म्हणावे लागेल. आता प्रशासन काळात किमान महिला स्वच्छतागृह सुरू होतील अशी अपेक्षा होती.
पण स्वच्छतागृहांची सांगाडे फक्त उभा करण्यात आले आहेत. ते अशा ठिकाणी केले आहेत की, तिथं कुणीही जाणार नाही तिथे जाण्या-येण्याची सोय करून पाण्याची व्यवस्था करून प्रत्यक्षात वापरण्यासाठी सुरु करणे अपेक्षित होते. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जत शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे खरेदी-विक्रीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असून भाजी विक्रेत्या महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शरीरावर परिणाम होतो.
स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी आंदोलने केल्यावर स्वच्छतागृहांचे सांगाडे खरेदी करून वर्ष उलटले तरी अजून महिला स्वच्छतागृह सुरू केली नाही. त्यामुळे आज हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. निधी खर्च करूनही महिलांचे स्वच्छतागृह सुरू करण्यास आर्थिक अडचण म्हणून आम्ही आज माता भगिनींच्या सोयीसाठी भीक मागून जिल्हाधिकारी यांच्याकडे मनीऑर्डर करत आहे. त्यांनी ते पैसे नगरपालिकेला वर्ग करून स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरू करण्याचे आदेश देऊन माता भगिनींना रक्षाबंधन भेट द्यावी असे विक्रम ढोणे म्हणाले.
या आंदोलनात शहनाज मुजावर, रंजना साळे, अंबवा माळी, जयश्री साळे, सुनीता पनाळकर, नंदाबाई बिराजदार, सुनीता जाधव, रत्नाबई कोळी, शांताबाई माळी,कमल माळी, महादेवी माळी, कमल शिंदे यांच्यासह लकी पवार, प्रशांत एदाळे, तानाजी कटरे , पापा हुजरे,विलास काळे,आकराम सरक, पवार, रामचंद्र मदने यांच्या सह भाजी विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा;