पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत उद्या (दि. ३१ ऑगस्ट) इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. इंडिया आघाडीतील अनेक राजकीय नेते या बैठकीसाठी मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर मविआच्या नेत्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जागावाटपासह इंडिया आघाडीच्या सामुहिक कार्यक्रमांबाबत माहिती दिली आहे.
या पत्रकार परिषदेत बुधवारी होणाऱ्या बैठकीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी बोलताना पवार यांनी राजकीय बदल घडवून आणण्यासाठी विरोधी आघाडी एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देईल, असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या वेळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल."