सांगली : गणेशोत्सव कालावधित शहरातील बाजारपेेठेत अशी गर्दी होती. Pudhari photo
सांगली

सांगली : बाजारपेठेला बाप्पा पावला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

यंदा लग्नसराईत असलेले मर्यादित मुहूर्त आणि त्यानंतर पावसाच्या संततधारेमुळे बाजारपेठेत निरुत्साह होता. मात्र, घरा-घरात उत्साह निर्माण करणार्‍या गणेशोत्सवाने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. व्यावसायिकांच्या ऑफर्स आणि त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने गणपती बाप्पामुळे बाजारपेठेलाही उभारी मिळाली. या कालावधित कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गणरायाच्या आगमनामुळे घरातील वातावरण उत्साही राहते. घरगुती बाप्पाने निरोप घेतला असला तरी, अनंतचतुर्दशीनंतर मात्र या उत्साहाची हुरहूर प्रत्येकालाच लागून राहणार आहे. याच गणेशोत्सवात सांगलीतील बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण दिसून आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली उलाढाल आणि त्यास मिळालेला प्रतिसाद यामुळे दसरा, दिवाळीसाठी व्यापार्‍यांनाही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या लग्नसराईत तुलनेने विवाहमुहूर्त कमी होते. त्यामुळे सोने चांदी, केटरिंग आणि इतर व्यावसायिकांना तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात यंदा जिल्हाभर सर्वदूर पावसानेही चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीकामात मग्न असल्याने बाजारपेठेत तुलनेने गर्दी कमी आणि निरुत्साहाचे वातावरण होते. गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष पंधरवडा व त्यानंतर दसरा, दिवाळीचा उत्साह असणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात व्यापारी वर्गाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार अपवाद वगळता व्यापार्‍यांना चांगला व्यवसाय झाला आहे. यामुळे आता पुढील सर्व सणासुदीलाही सकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मंडप, डेकोरेशन, केटरिंगला प्रतिसाद

गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने भव्यदिव्य मंडप उभारले जातात. यासाठी मागणीही वाढते. याशिवाय घरगुती आणि मंडळांच्या गणपतीच्या सजावटीसाठी डेकोरेशन साहित्याला यंदा चांगली मागणी होती. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव कालावधित मंडळांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. याचा फायदा केटरिंग व्यावसायिकांना झाला. त्यामुळे आठवडाभर केटरिंगशी संबंधित सर्व घटकांना चांगले काम मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

वस्तू, वाहनांची मोठी खरेदी

उत्सव कालावधित अनेक कंपन्यांकडून वस्तूवर भरघोस सूट, तर काहींनी भेटवस्तू जाहीर केल्या होत्या. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी होताना दिसून आली.

या कालावधित आमचा कोणताही सहकारी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काम करत नाही. सेवाभावी वृत्तीने काम केले जाते. अनेक आचारी, केटरर्स खर्च घालून महाप्रसादासाठी योगदान देतात. अनेक मंगल कार्यालयांचे संचालकही मदतीची भावना ठेवतात. उत्सवावेळी आचारी, महिला व तरुणांना रोजगार मिळतो.
- संतोष भट, अध्यक्ष, केटरर्स अ‍ॅण्ड मंगल कार्यालय असोसिएशन, सांगली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT