ऑगस्ट क्रांतिदिनाच्या स्मृती  
सांगली

ऑगस्ट क्रांतिदिनाच्या स्मृती देतील समाजाला दिशा

नव्या पिढीने ऑगस्ट क्रांतिदिनाचा ज्वलंत इतिहास समजून घेणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा
नंदू गुरव

सांगली : हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अनेकजण हुतात्मा झाले. घरादारावर तुळशीपत्र ठेवले. भूमिगत झाले. ब्रिटीश पोलिसांचा मार खाल्ला, पण अखेर याच स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीश सत्ता भारतातून हाकलून लावली. या स्मृती अत्यंत क्रांतिकारी तर आहेतच, पण आजच्या अस्वस्थ समाजाला योग्य दिशा देणार्‍याही आहेत. यासाठीच नव्या पिढीने आजच्या ऑगस्ट क्रांतिदिनाचा ज्वलंत इतिहास समजून घ्यायला हवा.

9 ऑगस्ट 1942. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश राजसत्तेला ‘चालते व्हा’, असा इशारा दिला आणि मग देशभरातली तरुण क्रांतिकारकांची, स्वातंत्र्यसैनिकांची फळी रस्त्यावर उतरली. ‘करा किंवा मरा’ या निर्धाराने गावागावांतल्या हजारो तरुणांनी स्वातंत्र्यचळवळीत झेप घेतली. बड्या नेत्यांची धरपकड सुरू झाली आणि मग याच तरुणांच्या हाती लढ्याची सूत्रे आली. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तासगावचा मोर्चा.

3 सप्टेंबर, 1942 हा तो दिवस. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या तासगाव पंचक्रोशीत मोर्चाची जोरदार तयारी केली. गावागावांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे तासगावकडे झेपावले. या प्रचंड गर्दीसमोर क्रांतिसिंह गरजले. जी. डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, धोंडिरामबापू माळी, नागनाथअण्णा नायकवडी, आदम पैलवान, भगवानबप्पा मोरे, दादा भोकरे, ज्ञानूबुवा गुरव सारे हत्यारांनिशी तयार होतेच, सोबत तासगावचे भाई गणपतराव कोळी, सदाशिव कराडे यांनीही तयारी केली होती. हत्यारबंद गर्दीने तासगावातील जोतिबा मंदिरापासून मोर्चाला सुरवात केली. मोर्चा गुरुवार पेठेत न्यायालयासमोर आला. जमावाने त्या वेळेचे न्यायाधीस एच. एस. पाटील यांना बाहेर बोलावून त्यांना गांधी टोपी घातली. कचेरीच्या तटावर उभे राहून कुंडलच्या मामासाहेब पवार यांनी राष्ट्रगीत म्हटले. धोंडिरामबापूंनी सहकार्‍यांसह पोलिस ठाण्यातील कोठडीतील कैदी, स्वातंत्र्यसैनिकांना मुक्त केले. मोर्चातून परत जातानाही गावोगाव सरकारी कार्यालये, चावड्यांवर हल्ले झाले. सरकारी विश्रामगृहे पेटवून देण्यात आली. नागनाथअण्णांनी बांबवड्याचा डाक बंगला फोडला. या मोर्चाने ब्रिटिशांना हादरवले.

9 सप्टेंबर 1942. या दिवशी निघालेल्या तासगावच्या ऐतिहासिक मोर्चाची दखल सार्‍या देशाने घेतली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने निघालेल्या या मोर्चाने प्रतिसरकारचा पाया घातला. या प्रतिसरकारचे केंद्र होते तासगाव शहर आणि कुंडल होते प्रशिक्षण केंद्र. या मोर्चाची साक्ष देत आजही तहसील कार्यालयाची जुनी वास्तू उभी आहे. समोरच स्मृतिस्तंभ आहे. त्यावर कारावास भोगलेल्या 51 स्वातंत्र्यसैनिकांची नावे कोरली आहेत. समस्त तासगावकरांचे ते ‘तीर्थस्थळ’ आहे.
प्रा. बाबूराव गुरव, ज्येष्ठ विचारवंत, तासगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT