सांगली

सांगली: खानापुरातील ४५ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर: शिंदे गट – राष्ट्रवादीतच ‘टशन’ !

अविनाश सुतार

विटा: पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तालुक्यात सरसकट पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढल्या जात नाहीत. तरीही भाजप आणि काँग्रेसची ताकद नगण्य आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्येच टशन पाहायला मिळणार आहे.

खानापूर तालुक्यातील ऐनवाडी, आळसंद, बलवडी खा., बलवडी भा. बामणी, बाणूरगड, बेणापूर, भाळवणी, भांबर्डे, भूड, चिखलहोळ, चिंचणी मं., ढवळेश्वर, धोंडेवाडी, धोंडगेवाडी, गाड, घानवड, घोटी बु., घोटी खुर्द, गोरेवाडी, हिंगणगादे, हिवरे, जाधवनगर, जाधववाडी, जखीनवाडी, जोंधळखिंडी, कळंबी, कमळापूर, करंजे, कावें, कुर्ली, लेंगरे, मादळमुठी, मोही, पंचलिंगनगर, रामनगर, रेवणगाव सांगोले, सुलतानगादे, ताडाचीवाडी, वेजेगाव, वलखड, वाळूज, वासुंबे, वाझर अशा एकूण ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत.
याबाबत तहसीलदारांकडून १८ नोव्हेंबर रोजी आधिसूचना जाहीर केली जाईल. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळामध्ये अर्ज भरणे, ५ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज माघारी घेता येतील. १८ डिसेंबररोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २० डिसेंबररोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असा एकूण निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

त्यामुळे स्थानिक नेते, कार्यकर्ते यांची लगबग सुरू झाली आहे. तर इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तालुक्यात भाजप आणि काँग्रेसची ताकद नगण्य आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरा सामना रंगणार आहे. कार्यकर्ते चांगलेच चांगलेच 'रिचार्ज' झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर यांच्या समर्थकांची सत्ता आहे; तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या समर्थकांची सत्ता आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची आरक्षणे जाहीर झाली आहेत. त्यामुळे इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ज्याठिकाणी खुले सोडून अन्य आरक्षणे पडली आहेत, तेथे उमेदवारीसाठी नेत्यांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. काही ग्रामपंचायतीत गतवर्षीचीच आरक्षणे पडली आहेत. त्याठिकाणी फेरआरक्षणे काढण्यासाठी हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांच्या हालचाली सुरू आहेत. मात्र आता अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये एका बाजूला नाराजी दिसत आहे.

आमदार बाबर यांनी 'टेंभू'च्या कामाबरोबर तालुक्यातील गावांतील अंतर्गत रस्ते व अन्य विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मोठी विकासकामे झाली आहेत. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत आमदार बाबर समर्थकांची सत्ता आहे. त्यांची ग्रामीण भागात मोठी पकड आहे. आमदार बाबर यांच्याबरोबर त्यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी तालुक्यात संपर्क वाढविला आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील व त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक हेही तालुक्यातील कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्याशी संपर्क साधत आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी निवडी झाल्या. त्यात तरुण कार्यकत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे तालुक्यात तरुण कार्यकर्त्यांची चांगली फळी तयार होऊ लागली आहे. आगामी निवडणुकीच्या त्यांनी चांगली तयारी सुरू केली आहे. त्यामुळे एकंदरीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असे मोठे 'टशन' पाहायला मिळेल, हे नक्की.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT