court file photo
सांगली

Crime News | राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणात 375 पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयात सादर

Crime News | राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात सरकार पक्षाचा अंतिम लेखी युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा
राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात सरकार पक्षाचा अंतिम लेखी युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावतीने मुख्य तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी हा युक्तिवाद न्यायालयात दाखल केला.

या सुनावणीवेळी ॲड. उज्ज्वल निकम व्हीसीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते.
६ नोव्हेंबर २०१७ रोजी सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २५ वर्षीय अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी यांना एका ल्युटीच्या प्रकरणात ताब्यात घेतले होते.

चौकशीदरम्यान तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनिकेत कोथळेला अमानुष मारहाण केली, मारहाणीत त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचा मृतदेह आंंबोली घाटात नेऊन जाळण्यात आला. यानंतर दोन आरोपी पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. नंतर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली होती.

या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद साधारण ३७५ पानांचा आहे. खटल्याची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यावेळी ॲड. उज्ज्वल निकम प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. सुनावणीदरम्यान सरकार पक्षतर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक प्रमोद नलावडे, अमोल ठाकूर आणि तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

संशयित गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहातच

नीलेश गडदे प्रकरणात चारच महिन्यांत तांत्रिक कारणास्तव (डिफॉल्ट) जामीन मंजूर झाला होता. मात्र, कोथळे हत्याकांड प्रकरणात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सर्व संशयित गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहातच आहेत. संशयितांनी अनेकदा जामिनासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले होते; परंतु तपास यंत्रणा आणि सरकार पक्षाने भक्कम युक्तिवाद करत प्रत्येक वेळी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आता गडदे प्रकरणात दुसरा 'मोक्का' लावला असून त्यात कोणताही तांत्रिक मुद्दा शिल्लक राहणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT