Sangli DCC Bank Election | सांगली जिल्हा बँक निवडणूक: गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे चुरस वाढणार; राजकीय हालचालींना वेग

सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशाने आटपाडीत जल्लोष; फटाक्यांची आतषबाजी
Gopichand Padalkar |
Gopichand PadalkarPudhari Photo
Published on: 
Updated on: 

Gopichand Padalkar Sangli

आटपाडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे आटपाडी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी आनंद व्यक्त केला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय संघर्ष रंगला होता. उमेदवारी अर्जाच्या वैधतेवरून सुरू झालेली न्यायालयीन लढाई अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. न्यायालयाच्या निर्णयामुळे पडळकर यांच्या उमेदवारीवरील अनिश्चितता दूर झाली असून, जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

न्यायालयीन लढाईत पडळकरांना दिलासा

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पडळकर यांनी जत ‘अ’ सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. सहकारी संस्थेतील सभासदत्वाचा कालावधी आणि सहकार क्षेत्रातील अनुभवाच्या पात्रतेवरून हा वाद निर्माण झाला.

छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १३ ऑक्टोबर रोजी त्यांचा अर्ज अवैध ठरवला. या निर्णयाला पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. १६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने निवडणुकीतील त्यांचा सहभाग निश्चित झाला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात रंगणार सामना!

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडळकर यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समर्थकांनी जल्लोष करत या चर्चांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

जिल्हा बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिल्ह्यातील राजकीय शक्तिप्रदर्शनाचीही ही कसोटी मानली जात आहे. पडळकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे असून, आगामी राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news