Jayant Patil on Ajit Pawar  Pudhari
सांगली

NCP Merger | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार जयंत पाटलांना म्हणाले होते; 'जे झालं ते विसरून...'

Jayant Patil | १२ फेब्रुवारीला विलीकरणाचा निर्णय जाहीर होणार होता

पुढारी वृत्तसेवा

Jayant Patil on Ajit Pawar

ईश्वरपूर : “माझ्याबद्दल जनमानसात जे काही गैरसमज आहेत ते पुसून मी पुन्हा साहेबांसोबत एकत्र येण्यास तयार आहे. जे झाले ते विसरून आपण एकत्र येऊ, आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ करू,” अशी ठाम आणि तीव्र भूमिका अजित पवार यांची होती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी दिली. १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. जयंत पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात अजितदादा अनेकदा माझ्या घरी येत असत. सायंकाळी येऊन जेवणानंतर सविस्तर चर्चा व्हायची. साहेबांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही त्यांची तीव्र इच्छा होती. जवळपास आठ ते दहा बैठका झाल्या असून सर्व बैठका माझ्याच घरी पार पडल्या. सुरुवातीच्या बैठकींमध्ये त्यांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. साहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता आणि ‘जे झाले ते विसरून एकत्र येऊ’ हीच त्यांची अंतिम भूमिका होती.

१६ तारखेला पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह माझ्या घरी बैठक झाली. यापूर्वी अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील तसेच पक्षाध्यक्षांसोबतही चर्चा झाली होती. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निकालानंतर एकत्र येण्याची तारीख जाहीर करण्याचे ठरले आणि अखेर १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली.

पुढे पवार साहेबांशी भेट घेण्यासाठी सर्वजण सकाळी बारामतीला गेले. तेथे सविस्तर चर्चा झाली आणि १२ फेब्रुवारीचा निर्णय सर्वांच्या संमतीने ठरवण्यात आला, असे आ. पाटील यांनी सांगितले.

सत्तेत जाण्याबाबत प्रश्न

“सत्ता स्वीकारण्याचा प्रश्न त्यांचा आग्रह नव्हता. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, यावरच त्यांचा भर होता. या संदर्भातील अधिक तपशील योग्य वेळी मांडेन,” असे जयंत पाटील म्हणाले. काही बैठकींना सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनाही अजित पवारांनी आपल्या भूमिकेची कल्पना दिली होती.

इतर नेत्यांची सहमती होती का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले होते, “मी निर्णय घेतला की तो अंमलात येतो. त्यामुळे चिंता करू नका.”

मंत्रीपदाबाबत भाष्य नाही

अर्थमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आ. जयंत पाटील म्हणाले, अजित पवारांचा पक्ष सध्या स्वतंत्र आहे. त्यांच्या पक्षातील निर्णयांवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.

दादांच्या आठवणींना उजाळा

अजित पवारांसोबतच्या संबंधांबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, १९९१ पासून आम्ही एकत्र काम करत होतो. विरोधी पक्षातही सोबत बसायचो. राजकारणात मर्यादा पाळण्याचे भान त्यांना होते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अत्यंत प्रभावी काम केले असते. त्यांच्या अचानक जाण्याने फार मोठा धक्का बसला आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन

अजित दादांची अंतिम इच्छा पक्ष एकत्र येण्याची होती. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

भाष्य टाळले

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत आ. पाटील म्हणाले, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. यावर मी भाष्य करणार नाही.”

सखोल चौकशीची मागणी

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. तांत्रिक बिघाड होता का, अपघातास जबाबदार कोण, याचा तपास व्हायला हवा, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT