पलूस : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी अज्ञात चोरट्याकडून पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने ओढण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी चोरट्याने हत्याराने त्यांच्या डोक्यात हल्ला केला. नम्रता अजित आवटे (वय 30) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कृष्णाकाठावर गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रात्री विठ्ठलवाडी परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्याने नागरिक रात्रभर जागून गस्त घालत आहेत. जखमी महिलेचा पतीही यामध्ये सहभागी होता. दि. 15 रोजी स्वातंत्र्यदिन असल्याने पहाटे लवकर अजित आवटे कुंडल पोलिस ठाण्यात ड्युटीवर गेले होते. सकाळी आवटे यांच्या पत्नी नम्रता या स्वयंपाक करीत होत्या. यावेळी एक अज्ञात व्यक्ती येऊन तिच्यासमोर उभी राहिली. त्याने डोक्याला, तोंडाला मास्क लावला होता. हातात ग्लोव्हज् घातले होते. या व्यक्तीने काही तरी स्प्रे करीत महिलेच्या गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने महिलेच्या डोक्यात शस्राने वार केला. महिलेनेसासर्यास आवाज देऊन बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोराने तिथून पळ काढला.
महिला बाजूच्या दाराकडे धावली. त्यानंतर आजुबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी पलूस पोलिसांना माहिती दिली. तसेच आजुबाजूला हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व महिलेस पलूस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे.घटनेची माहिती समजताच पलूसचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेत महिलेची विचारपूस केली. मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.