कल्याण : चोरी करण्यासाठी नोकर बनण्याचा बहाणा करून चाेरटे मुद्देमाल साफ करत आहेत. असाच एक प्रकार नुकताच विष्णू नगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आला आहे. चोरी करणार्या या आतंरराष्ट्रीय टोळीला विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे.
विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत 27 जुलै रोजी कुंदन म्हात्रे यांच्याकडे मागील दिड वर्षापासून घरकाम करणारा इसम सागर विश्वकर्मा उर्फ थापा याने कुंदन यांच्या बिल्डींगचे मेनगेट तोडून व बेडरूममधील कपाटे उचकटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, 10 विवीध कंपन्यांची घडयाळे, रोख रक्क्म भारतीय चलन, डॉलर व युरो अशी एकूण 15 लाख 52 हजार 807 रुपये मालमत्तेची चोरी केली होती. याप्रकरणी विष्णु नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी घटनास्थळी दाखल होत गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. त्यांनी दिलेल्या सुचनांच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोनिरी (गुन्हे) गहिनीनाथ गमे, सपोनि सचिन लोखंडे, आदींच्या पथकाने आरोपी लीलबहादूर लालबहादुर कामी यास नवी मुंबई येथुन व टेकबहादूर जगबहादुर शाही, आणि आरोपी मनबहादूर रनबहादूर शाही यांना बेंगलोर येथुन ताब्यात घेतले आहे. दरम्यान अटक आरोपींकडून या गुन्हयातील चोरी गेलेल्या मालापैकी 159 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, 230 ग्रॅम चांदीच्या वस्तु, विवीध कंपन्यांची एकूण 8 घड्याळे, रोख रक्कम (त्यामध्ये भारतीय चलनाच्या व परीकीय चलनाच्या नोटा व नाणी) अशी एकूण 6 लाख 96 हजार 567 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती व.पो.नि. संजय पवार यांनी दिली.