80-year-old woman killed in hit-and-run by unknown motorcycle
शिराळा : पुढारी वृत्तसेवा
शिराळा-कोकरूड रस्त्यावर बिऊर गावच्या मोरणा नदीच्या पुलाजवळ अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १३ एप्रिल) सायंकाळी घडली. किसाबाई बाळकू पाटील (वय ८०, रा. बिऊर) असे मृत वृद्धेचे नाव असून, अपघातानंतर चालक मोटारसायकलसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ७:३० वाजण्याच्या सुमारास किसाबाई पाटील या मोरणा नदीचा पूल ओलांडून कोकरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूने पायी चालत होत्या. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी संबंधित चालकाने कोणतीही माहिती न देता मोटारसायकलसह घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या किसाबाई पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचे नातू राजेंद्र विष्णू पाटील (वय ३५, रा. नाथ फाटा, शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.