60 lakh rupees fraud of Shivneri credit institution in Ashtya
आष्ट्यात शिवनेरी पतसंस्थेची 60 लाख रुपयांची फसवणूक  Pudhari File Photo
सांगली

आष्ट्यात शिवनेरी पतसंस्थेची 60 लाख रुपयांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

आष्टा, पुढारी वृत्तसेवा : येथील शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन कर्जदारांनी संस्थेचे बोगस शिक्के, पत्र व बोगस कर्जमुक्ती लेख तयार करून संस्थेची 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संस्थेने जिल्हा पोलिस अधीक्षक, मुद्रांक जिल्हाधिकारी व आष्टा पोलिस ठाण्यात दुय्यम निबंधकांसह आठ जणांविरुद्ध तक्रार दिली आहे.

शहाजीबापू डोंगरे व संदीप आनंदा डोंगरे (रा. डोंगरे मळा, आष्टा), महेश मारुती राजगुरू (रा. दत्त वसाहत, आष्टा), आष्ट्याच्या दुय्यम निबंधक श्रीमती सु. श. सातपुते, दीपक महादेव खोत (रा. खोत मळा, आष्टा), लिंबाजी महादेव ऐवळे (रा. मिरजवाडी), राजेश चंपालालजी छाजेड (रा. माधवनगर, सांगली) व अमित शिवाजी सुतार (रा. शामरावनगर, सांगली) अशी तक्रारीतील नावे आहेत. संस्थेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहाजी डोंगरे व संदीप डोंगरे यांनी 24 मार्च 2023 रोजी प्रत्येकी 30 लाख रुपये याप्रमाणे 60 लाखांचे तारण गहाण कर्ज संस्थेकडून घेतलेले आहे. त्यासाठी कर्जदारांनी आपल्या मालकीची आष्टा येथील रि.स.नं. 190/2 ही शेतजमीन आष्टा दुय्यम निबंधक यांच्याकडे तारण गहाण दिलेली आहे.

दरम्यान, कर्जदार डोंगरे यांनी संस्थेचे घेतलेले कर्ज बुडविण्याच्या व परतफेड न करण्याच्या उद्देशाने संस्थेचे खोटे शिक्के व पत्र तयार केले. त्या पत्रावर सेक्रेटरी म्हणून बोगस सह्या केल्या. तसेच आष्टा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात त्यांच्याशी संगनमत करून बोगस रजिस्टर्ड कर्जमुक्ती लेख क्रमांक 259/2024 व 260/2024 तयार केलेले आहेत. महेश राजगुरू याने संस्थेचा शाखाधिकारी नसताना, स्वत: दुय्यम निबंधकांसमोर उभे राहून खोट्या कर्जमुक्ती लेखावर शाखाधिकारी म्हणून सही केली आहे. आष्ट्याच्या दुय्यम निबंधक श्रीमती सु. श. सातपुते यांनी संस्थेचे पॅनकार्ड न तपासता व संस्थेचा शाखाधिकारी म्हणून उभ्या असलेल्या व्यक्तीचे संस्थेने दिलेले ओळखपत्र न तपासता संगनमत करून संस्थेची फसवणूक केलेली आहे. दुय्यम निबंधक यांनी शासनाने दिलेल्या अधिकाराचा बेकायदेशीर वापर करून दखलपात्र गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतलेला आहे. दीपक खोत व लिंबाजी ऐवळे यांनी या खोट्या दस्तावर ओळख देणार म्हणून, तर राजेश छाजेड व अमित सुतार यांनी दस्तावर साक्षीदार म्हणून सह्या केलेल्या आहेत.

आठ संशयितांनी संगनमताने खोट्या कर्जमुक्ती लेखाचा वापर करून त्याची नोंद तलाठी कार्यालयात केली आहे. तसेच गट नं. 190/2 या मिळकतीवर संस्थेचा असणारा बोजा फेरफार नंबर 20809 व 20810 नुसार कमी केलेला आहे. संस्थेने 10 जुलै 2024 रोजी सदरचे फेरफार व कर्जमुक्ती लेखाची नक्कल काढल्यानंतर ही बाब संस्थेच्या निदर्शनास आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी वरील सर्व आठ संशयितांविरुध्द फिर्याद दाखल केलेली आहे.

SCROLL FOR NEXT