देवदर्शनाला निघालेल्या 5 युवकांना जीपने ठोकरले Pudhari Photo
सांगली

देवदर्शनाला निघालेल्या 5 युवकांना जीपने ठोकरले

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी चालत चाललेल्या मिरज येथील 5 युवकांना मागून येणार्‍या जीपने ठोकरले. यामध्ये प्रेम अजित गोसावी (वय 16, रा. गोसावी गल्ली, कोल्हापूर रोड, मिरज) याचा जागीच मृत्यू झाला, तर विजय अशोक गोसावी (वय 20) हा अत्यवस्थ आहे. अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाले. जखमींमध्ये प्रेम दत्ता गोसावी, पवन बाळासाहेब गोसावी व अभिषेक सुभाष गोसावी यांचा समावेश आहे.

मिरजेतील गोसावी गल्लीमधील युवक गेली 7 वर्षे घटस्थापनेदिवशी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मिरजेतून कोल्हापूरला चालत जातात. दरवर्षीनुसार यंदाही ते बुधवारी रात्री पायी कोल्हापूरला निघाले होते. मध्यरात्री जयसिंगपूरजवळ विजय ढाब्याजवळ मागून आलेल्या जीपने त्यांना ठोकरले. यामध्ये प्रेम गोसावी याचा जागीच मृत्यू झाला, तर विजय गोसावी याच्या डोक्याला मार लागला. यामध्ये विजयच्या कानातून व डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. अन्य तिघे प्रसंगावधान ओळखून बाजूला गेल्याने किरकोळ जखमी झाले. यावेळी मोठा आवाज आल्याने हॉटेलमधील कर्मचारी बाहेर आले. त्यांनी 108 क्रमांकाशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. आपत्कालीन रुग्णवाहिकेमधून प्रेम गोसावी याचा मृतदेह व जखमी विजय गोसावी यांना सांगलीस शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. यादरम्यान अन्य जखमी युवकांनी नातेवाईकांशी संपर्क करून शासकीय रुग्णालयामध्ये बोलावून घेतले. अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

शासकीय रुग्णालयात गर्दी

पहाटे 3 च्या दरम्यान युवकांचे नातेवाईक, टायगर ग्रुपचे आकाश गोसावी, जिल्हाध्यक्ष पिंटू माने, अजय माने यांच्यासह पाचशेजणांचा जमाव शासकीय रुग्णालयासमोर जमा झाला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रेम गोसावी याला मृत जाहीर केले. शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांना अपघाताची माहिती देऊनसुद्धा जबाब नोंदविण्यास विलंब झाला.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी प्रेमचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यादरम्यान आकाश गोसावी यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक जोशी यांच्याकडे जयसिंगपूर पोलिसांच्या या भूमिकेबद्दल तक्रार केली. जोशी यांनी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांना सूचना केल्यानंतर सकाळी 8 वाजता जयसिंगपूरचे पोलिस सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT