कृषी कंपनीला 23 लाखांचा गंडा  Pudhari File Photo
सांगली

सांगली : कृषी कंपनीला 23 लाखांचा गंडा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

ऑरबिट क्रॉप मायक्रो न्यूट्रीयंटस् या कृषी कंपनीमधील दोन कर्मचार्‍यांसह बँकेच्या अधिकार्‍यांनी संगनमत करून तब्बल 23 लाख 25 हजार 284 रुपयांचा गंडा घातला. ही घटना सन 2018 ते दि. 5 ऑक्टोबर 2023 या कार्यकाळात घडली. याबाबत दीपक प्रकाश राजमाने (रा. सिध्दिविनायकपूरम गृहनिर्माण सोसायटी, दत्तनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी याप्रकरणी उत्तम महावीर अडसूळ (वय 37), भाग्यश्री उत्तम अडसूळ (33, दोघे रा. कुपवाड), रविराज मुरग्याप्पा पळसे (42, रा. दत्तनगर, कर्नाळ रस्ता, जॅकवेल रस्ता, सांगली) आणि विवेक रंजन (49, रा. श्रीराम संकुल, एसटी कॉलनी रस्ता, विश्रामबाग, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

याबाबत माहिती अशी, शहरातील विजयनगर परिसरात मागील काही वर्षांपासून ऑरबिट कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात संशयित उत्तम अडसूळ हा मुख्य लेखाकार, तर भाग्यश्री अडसूळ या सहलेखाकार म्हणून कार्यरत होत्या. या दोघांवर कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यातूनच त्यांची युनियन बँक डेप्युटी ब्रँचचे रविराज पळसे आणि मार्केट यार्ड येथील शाखेतील शाखाधिकारी विवेक रंजन यांच्याशी ओळख झाली होती. चौघा संशयितांनी आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्लॅन आखला. कंपनीच्या देखभालीसाठी आणि कर्मचार्‍यांच्या पगार करण्यासाठी फिर्यादी दीपक राजमाने यांनी कोरे धनादेश लेखाकारांच्या ताब्यात दिले होते. धनादेशावर परस्पर रक्कम टाकून ते पैसे काढण्यात येत होते.

2015 पासून अपहाराचा प्रकार सुरू

हा प्रकार सन 2015 पासून सुरू होता. कंपनीच्या वसुली अधिकार्‍यांनी वसूल केलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर टाकणे बंधनकारक असताना संशयित उत्तम अडसूळ हा ती रक्कम स्वत:च्या खात्यावर वर्ग करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतरदेखील फिर्यादी राजमाने यांनी फिर्याद दाखल करण्यास विलंब लागला. पोलिसांनी संशयितांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT