कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
महसूल खात्यात तलाठ्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील एका महिलेसह अन्य दोन परीक्षार्थींची 18 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी कवठेमहांकाळ तालुक्यातीलच दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विकास बापू पाटील (रा. कुकटोळी) व प्रवीण गुंडा होनराव (रा. महांकाली मंदिराजवळ कवठेमहांकाळ) अशी संशयितांची नावे आहेत. धनश्री मंगेश पाटील (वय 27, रा. दिघी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित विकास पाटील याने तलाठीपदी नोकरी लावतो, असे म्हणून धनश्री पाटील यांच्याकडून 9 लाख रुपये, तर संजय यल्लाप्पा रायपुरे त्यांच्याकडून त्यांच्या पत्नीला नोकरीत भरती करतो, असे भासवून 5 लाख रुपये, तर अन्य एका युवतीकडून 4 लाख रुपये घेतले आहेत. त्यासाठी एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत संशयित विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्या खात्यात या तिघांनी पैसे भरले आहेत.
परीक्षा झाल्यानंतर त्यांना नियुक्तीसंदर्भात वारंवार विचारणा केली असता, त्यांना शासनाचे नियुक्तीपत्र पाठवले. मात्र त्यानंतर बर्याच कालावधीनंतरही त्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे या तिघांनी संशयितांकडे पैशाची मागणी केली असता, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दोघांविरोधात फिर्याद देण्यात आली. कवठेमहांकाळ पोलिसांनी विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.