जत : पुढारी वृत्तसेवा : सामूहिक विहिरीतील गाळ का काढू दिला नाही ? या कारणावरून जत तालुक्यातील कोसारी येथे चुलते व पुतण्याचा दुहेरी खून झाला आहे. पाच जणांवर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. दोघांचा खून केल्याप्रकरणी व पाच जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रवीण विलास यमगर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. यातील शिवाजी बाबा यमगर, आनिल तानाजी यमगर, सुनील तानाजी यमगर या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभा केले असता न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या खून प्रकरणातील तानाजी बाबा यमगर, धनाजी बाबा यमगर, (रा. कोसारी) शहाजी बिरा सोलंनकर, जनाबाई बिरा सोलंनकर (रा. शेगाव) हे अद्याप फरार आहेत. आरोपीच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक आरोपीच्या मागावर आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी घटनास्थळीची पाहणी करून कसून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या दुहेरी खुनामुळे कोसारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोसारी येथील महानूर वस्ती येथे भावकीतील यमगर यांच्या सामूहिक विहिरीतील गाळ काढण्याचा व मालकी हक्कावरून दोन कुटुंबियांमध्ये वाद होता. तानाजी बाबा यमगर व त्याच्या साथीदाराने शनिवारी सकाळी गाळ काढण्याच्या कारणावरून प्रशांत दादासो यमगर व विलास नामदेव यमगर या दोघांवर चाकू, कुऱ्हाडीने हल्ला चढवला. यात दोघेही जागीच ठार झाले होते. त्यानंतर प्रवीण विलास यमगर, जयश्री विलास यमगर, बाळाबाई यमगर, निकिता यमगर, प्रियंका यमगर यांच्यावर हल्ला चढवला. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे करीत आहेत.
हेही वाचा