सांगली : रेड येथे अपघात; दहा जखमी | पुढारी

सांगली : रेड येथे अपघात; दहा जखमी

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : रेड (ता. शिराळा) येथे शिराळा पेठ मुख्य रस्त्यावर ऊस ट्रॉलीला मागून चारचाकी वाहनाची धडक दिल्याने सागाव (ता. शिराळा) येथील दहाजण जखमी झाले. यातील चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना कोल्हापूर, कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान घडला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सागाव येथील चालकासह दहाजण पहाटे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते देवदर्शन करून सागाव येथे निघाले असता उसाने भरलेला ट्रॉलीसह असणार्‍या ट्रॅक्टरला चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, चारचाकी गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये गाडीचालक संताजी शंकर पाटील (वय 50), उद्धव ईश्वरा पाटील(वय 60) या गंभीर जखमींना कोल्हापूर येथे शिवाजी भावाना चौगुले (वय 68) यांना कराड येथे सुभाष शंकर पाटील ( वय 60) यांना इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भीमराव शंकर पाटील (वय 70), भगवान महादेव कोकाटे (वय 67), बाळकृष्ण भगवान पवार (वय 39), दीपक संभाजी मोहिते (वय 28), तानाजी गणपती पाटील (वय 57), कुणाल दिलीप कोकाटे (वय 16) यांना शिराळा येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Back to top button