सांगली, पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड मजूर पुरवितो म्हणून 11 लाख 96 हजार रुपयांची रक्कम घेऊन ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत रमेश पांडुरंग पाटील (वय 40, रा. पद्माळे, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आसाराम गोपीचंद भिल (रा. नंदाणी, जि. धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्माळे येथील रमेश पाटील यांनाही 12 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. संशयित आसाराम भिल हा 2021 पासून पाटील यांना ऊस तोड मजूर पुरवितो. त्यामुळे पाटील यांचा त्याच्यावर विश्वास होता. गतवर्षीच्या ऊस तोडीसाठी तो पद्माळे परिसरात होता. त्याच्याकडे गेल्या वर्षीचे 3 लाख 66 हजार रुपये येणेबाकी होते. 2023-24 या वर्षासाठी ऊस तोड मजुरासाठी पाटील यांनी त्याला 11 लाख रुपये दिले. एकूण 22 कामगारांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे पैसे देऊन करारही करण्यात आला. तरीही त्याने ऊस तोडीसाठी मजूर पुरविले नाहीत. तसेच पाटील यांचे पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी भिल याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भिल याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. वाहतूकदारांकडून पैसे घेऊनही ऊस तोडीसाठी मजूर पुरवठा केला जात नाही. याबाबत पोलिसांत अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत.