DGCA FIR Rohit Pawar Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील दिरंगाईवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच Directorate General of Civil Aviation (DGCA) विरोधात FIR दाखल करण्याची मागणी करत रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विमान अपघातानंतर संबंधित VSR कंपनीवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने, त्यासाठी जबाबदार असलेल्या DGCA विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुरुवातीला अधिकाऱ्यांकडून FIR नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे रोहित पवार आणि अमोल मिटकरी दोघेही आक्रमक झाले. “आमच्या घरातील माणूस गेला आहे, राज्याचा एक महत्त्वाचा नेता अपघातात मृत्युमुखी पडला आहे. अशा गंभीर घटनेत FIR न घेणं ही मोठी बेपर्वाई आहे,” असे सांगत रोहित पवार यांनी पोलिसांसमोर आपली भूमिका मांडली.
FIR दाखल न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित झोनचे डीसीपी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. प्रशासनाने प्रथम तक्रार नोंदवावी असे सांगितले होते, मात्र रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे FIR वरच आग्रही आहेत.
ज्यावेळी रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तिथं जे अधिकारी होते, त्यांच्याकडून सुरुवातीला एफआयआर दाखल करण्यास नकार देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, विमान अपघाताच्या चौकशीला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पोलिस आणि DGCA पुढे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.