Raj Thackeray Questions FIR in Ajit Pawar Plane Crash Case Pudhari
महाराष्ट्र

Raj Thackeray: धुक्यामुळे की धोक्यामुळे? FIR दाखल... अजित पवारांच्या अपघात प्रकरणी राज ठाकरेंचा सरकारला सवाल, काय म्हणाले?

Raj Thackeray Questions FIR in Ajit Pawar Plane Crash Case: अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

Rahul Shelke

Raj Thackeray Ajit Pawar Plane Crash FIR Controversy: अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास महिना उलटून गेला असताना या प्रकरणाभोवतीचे प्रश्न अधिकच गडद होताना दिसत आहेत. अपघात होता की घातपात, या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेच्या चौकशीबाबत सातत्याने आवाज उठवला असून एफआयआर नोंदवण्याच्या प्रयत्नांत अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एफआयआरवरून निर्माण झाला वाद

रोहित पवार यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर 26 फेब्रुवारीला बारामती येथे एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ठिकाणी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि अपघाताशी संबंधित तांत्रिक बाबींची माहिती दिली.

भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “हा अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे झाला, हे महाराष्ट्राला अजूनही समजलेले नाही,” असे ते म्हणाले. रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे त्यांनी नमूद केले.

“एफआयआर का घेतला जात नाही?”

राज ठाकरे यांनी विशेषतः एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, एखाद्या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी संबंधितांकडून तक्रार दाखल केली जात असेल, तर ती स्वीकारण्यास अडथळे का आणले जात आहेत? “जर हा केवळ अपघात असेल आणि घातपाताचा प्रश्नच नसेल, तर एफआयआर नोंदवण्यास सरकार का कचरत आहे?” असा थेट सवाल त्यांनी केला.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ती थांबवली, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या घटनेमुळे संशयाला अधिक वाव मिळत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

“संशय निर्माण होण्यास सरकार जबाबदार?”

राज ठाकरे यांनी यासंदर्भात सरकारलाही लक्ष्य केले. “लोकांना कुठेही एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात तक्रार घेण्यास नकार दिला जात असेल, तर यात काही काळंबेरं आहे का असा प्रश्न उपस्थित होतो,” असे ते म्हणाले.

तसेच, या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही संवेदनशीलतेने लक्ष घालावे, कारण हा त्यांच्या कुटुंबाशी संबंधित विषय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या सर्व घडामोडींमुळे अपघाताच्या चौकशीची दिशा आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहित पवार आक्रमक भूमिका घेत असताना, राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आता सरकारकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते आणि चौकशीची प्रक्रिया कशी पुढे सरकते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT