महाडकरांचे आराध्य दैवत श्रीवीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात विन्हेरे गावची ग्रामदेवता श्री झोलाईमाता या देवीचा मान व आगमनाचा थाट काही वेगळाच असतो. श्रीवीरेश्वर महाराज यांची बहीण झोलाईमातेसह महाडवासिनी जाकमाता, नाते गावाचा रवालनाथ, पोलादपूरचे श्री बहिरीनाथ, दासगावचे श्रीबहिरी आदी श्रीवीरेश्वर महाराज यांची भावंडे म्हणून मानली जातात. श्रीवीरेश्वर महाराज या कुटुंबाचा प्रमुख म्हणून गणला जात असल्याचे सांगण्यात येते.
विराज पाटील, विन्हेरे
महाडपासून 22 किमी अंतरावर विन्हेरे गाव आहे. या गावाची ग्रामदेवता व 84 गावांची रक्षणकर्ती झोलाईमाता या गावाची व श्रीवीरेश्वर महाराज छबिना उत्सवाची शान असा लौकिक आहे.
झोलाई देवीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. झोलाई देवी ही नाशिकच्या सप्तशृंगीचा अवतार असून तिचे सप्तशृंगी गडावर शक्तीपीठ असल्याचे वर्णन करण्यात आले आहे तसेच हे शक्तीस्थान देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धेपीठ असून ती नाथांची जननी आहे.
महाडच्या छबिना उत्सवात झोलाईमातेचे स्थान आगळेवेगळे आहे. छबिना उत्सवात महाड तालुक्यातील अनेक ग्रामदेवतांच्या पालख्या श्रीवीरेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी येत असतात. त्याच वेळी विन्हेरेच्या झोलाई मातेचा आगमनाचा थाट वेगळाच भासतो. झोलाई देवी म्हणजे साऱ्या पंचक्रोशीतील दैवत, साऱ्यांचे मान. या दैवतावर सारेच जण हक्क सांगताना दिसतात. समाज व्यवस्थापनात साऱ्या जातींना मानाचे, आदराचे स्थान असते. आपआपली कामे लोक त्या त्या जातीचा सन्मान आहे, असे समजून करत असतात.
धोबी देवीची वस्त्रे पायघड्या इत्यादी धुण्यात धन्यता मानतात. सोनार मंडळी मुखवट्यांना पॉलिश करून देतात. भोई लोक पालखिचा सन्मान सांभाळतात. कष्टकरी हमाल मंडळी आलेल्या गाव देवीला मोठ्या सन्मानाने परत घेऊन जात असतात तर छबिन्याचा उत्सव दिसावा म्हणून खोबरे जाळून त्याच्या मशाली पेटवितात. यालाच हिलाल असा शब्द प्रयोग आहे. दुसरा सहकारी त्या मशालिला नारळ टाकून जाळ तेवत ठेवण्याचे काम करतो. हे काम कातकरी मंडळी सन्मानाने करत असतात.
महाडकर मंडळी देवीच्या दर्शनाला आवर्जून जातात. महाडच्या छबिन्याला देवी येते. नगारा निनादतो. आई माता झोलुबाई भोईघाटवर थांबते. श्रीवीरेश्वर देवस्थानचे पंच आरती घेऊन देवीला गावात येण्याचे निमंत्रण देतात. इथपासून देवीचे मानकरी भोई लोक असतात. रात्री देवीचे आगमन, मानसन्मान झाल्यानंतर गोंधळ झाल्यावर झोलाई देवीची पालखीसह इतर पालख्या व सासनकाठ्या वाजतगाजत नाचविण्यात येतात. हा सोहळा पहाटेपर्यंत चालत असतो. यानंतर सर्व पालख्या वीरेश्वर मंदिरामध्ये पुन्हा येतात. यानंतर महिला देवीची खण-नारळाची ओटी भरतात. दुपारी हमाल-कष्टकरी झोलाई मातेची पालखी वाजतगाजत बाजारपेठ मार्गे महाड शहर-पोलीस चौकी येथे मार्गस्थ होते.