अलिबाग : सुवर्णा दिवेकर
महिलांच्या रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात उद्भवणा-या आरोग्य समस्यांवर उपचार मिळावेत, म्हणून आरोग्य विभागामार्फत 14 जानेवारीपासून जिल्हा-उपजिल्हा, महानगरपालिका रुग्णालये व निवडक ग्रामीण रुग्णालयांत विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. अलिबागमधील रायगड जिल्हा रुग्णालयातही या क्लिनिकला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्लिनिक सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यात 40 महिलांची तपासणी करण्यात आली.
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा, जिथे मासिक पाळी सलग 12 महिने थांबते. प्रजनन काळ संपतोय हे इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे होते आणि साधारणपणे 45 ते 55 वयोगटात येते. ज्यामध्ये हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग्ससारखी लक्षणे प्रामुख्याने दिसतात.
रजोनिवृत्तीमध्ये उष्णतेचे झटके, रात्री घाम येणे, निद्रानाश, मूड बदलणे (चिंता, चिडचिड), स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत घट, सांधेदुखी, त्वचेत बदल आणि लैंगिक इच्छा कमी होणे यांसारख्या अनेक शारीरिक आणि भावनिक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या महिलांमधील इस्ट्रोजेन हार्मोनच्या पातळीतील बदलांमुळे होतात आणि मासिक पाळी थांबल्यानंतरही दीर्घकाळ टिकू शकतात.
रायगड जिल्हा रुग्णालयातील हे रजोनिवृत्ती क्लिनिक दर बुधवारी महिलांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या रजोनिवृत्ती क्लिनिकमध्ये 45 ते 55 वयोगटातील महिलांची मोफत तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन या दिवशी केले जाते. क्लिनिकच्या शुभारंभानंतर सुमारे 40 महिलांनी आपली तपासणी करून घेतली.
महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मेनोपॉज टप्प्याकडे आजवर सामाजिक आणि वैद्यकीय पातळीवर पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळेच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय महिलांच्या आरोग्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिकचा चांगला उपयोग होणार आहे.
याबाबत आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मेनोपॉज टप्प्याकडे आजवर सामाजिक आणि वैद्यकीय पातळीवर पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळेच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय महिलांच्या आरोग्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिकचा चांगला उपयोग होणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील हे रजोनिवृत्ती क्लिनिक दर बुधवारी महिलांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या वयोगटातील महिलांची मोफत तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन या दिवशी केले जाईल. पहिल्या आठवड्यात या क्लिनिकला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. जास्तीत जास्त महिलांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा.डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड