Matheran water crisis Pudhar
रायगड

Matheran water crisis: माथेरानमधील पाणीसमस्या दिवसेंदिवस जटिल; माथेरानकरांमध्ये संतापाचे वातावरण

पाण्याच्या कमतरतेमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता;

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कदम

माथेरान: माथेरानमध्ये पाणीसमस्येविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माणझालेआहे. या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्धही राग व्यक्त केला जात आहे. मार्चमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी माथेरानमध्ये वसुलीसाठी फिरत होते.

आता माथेरानकरांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या वेळी कंत्राटी कामगारांच्या भरोशावर माथेरानचा पाणीपुरवठा सोडून ही मंडळी गायब झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करून माथेरानकरांना हक्काचे पाणी मिळावे, याकरीता माथेरानकर एकवटले आहेत.

जानेवारीमध्ये पर्यटन हंगामामध्ये पाणीटंचाई येऊ नये, म्हणून जलप्राधिकरणाने आठवड्यातून एकदा पाणी बंद नियोजन केले होते, परंतु माथेरानकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंपांची व्यवस्था मात्र करण्यास काही केले नव्हते, त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटन हंगामामध्ये पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे, हा नियोजन शून्य कारभार आहे. फक्त वसुलीसाठी माथेरानमध्ये येणारे अधिकारी यांच्यावर शासनाचा कोणताही अंकुश नाही.

पर्यटन हंगाम आलेला असताना अद्यापही माथेरान वासीयांना पाण्याच्या जटील समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने माथेरानकर आक्रमक झालेले दिसत आहेत. 6 रोजी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांसह विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार, नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कदम, सीताराम शिंदे, सागर जोशी, अतिष ढेबे यांनी थेट जल शुद्धीकरण केंद्रावर जाऊन धडक दिली असता याठिकाणी कार्यालयात अभियंता हे नेहमीच उपस्थित रहात नसल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

नेरळ उल्हास नदीतून पाण्याचा उपसा केला जात आहे.या मार्गावर एकूण तीन पंप बसविण्यात आले आहेत.एकूणच पाण्याची पंपिंग 24 तास चालू असते. जुम्मा पट्टी येथे सोळा तास पंपिंग होत असतानाही इथे फक्त दहा तास का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन दिवस माथेरानमध्ये फक्त 8 तास पंपिंग केली आहे.

माथेरान लेकची पंपिंग बंद असून 32 फूट पाणीसाठा शिल्लक असून या तलावाची तीन ते चार वर्षे स्वच्छता न केल्यामुळे 15 फूट गाळ साचला आहे. फिल्टर हाऊसला सफेद रेती संपल्याने पाणी फिल्टर प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होत असून नागरिकांना दुषित पाणी मिळत आहे.त्यातच नेरळहुन पाण्याचा उपसा होताना वाटेत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे जोडण्या केलेल्या दिसत आहेत.

पाण्याचे पंप सुध्दा नादुरुस्त असतात अशावेळी येथील शारलोट लेक मधून पाण्याचा उपसा केला जात असतो.लेकची पातळी खालावल्याने गाळ वजा करता वीस फूट पाण्याची पातळी शिल्लक आहे. यामुळे गावातील विविध ठिकाणी हप्त्यातून एक दिवस पाणी कपात केली जात असून गावात नागरिकांना पाणी कमी दाबाने एक ते दीड तास पुरविले जात आहे. जोपर्यंत नेरळ पासून अनधिकृत जोडण्या काढल्या जात नाहीत तोपर्यंत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे.एकूणच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारा बाबतीत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

शारलोट लेक वरील पंपिंग मशीन बंद झाल्याने ताबडतोब आम्ही स्वखर्चाने दुरुस्तीसाठी पाठवली.वॉटर पाईप येथील पंप बसवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.संबंधित अधिकारी वर्गाशी सातत्याने चर्चा करून लवकरच पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे या हंगामात पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता आहे.नागरिकांनी सुध्दा पाण्याचा जपून वापर करावा.
- चंद्रकांत चौधरी, नगराध्यक्ष माथेरान
माथेरानकरांचे जीवनमान हे पर्यटकावर अवलंबुन आहे. सध्या माथेरानमध्ये पाणी टंचाई भासत आहे.आता सीझन सुरु होणार आहे, अशा वेळी माथेरानकराना अपुऱ्या पाणी पूरवठ्यामुळे व्यवसायावर गदा येऊ नये. या करिता एमजीपीने सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे.
- वसंत कदम, ग्रामस्थ माथेरान
सन 2023 ,24 25 या वर्षात नेरळची पाण्याची पंपिंग सरासरी 15 तास चालत होती. जी आता जेमतेम आठ ते दहा तासावर आली आहे यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे याची प्रामुख्याने चौकशी होणे गरजेचे आहे.
- सिताराम कुंभार, विरोधी पक्षनेते, माथेरान नगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT