Virar Alibaug Corridor pudhari photo
रायगड

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेेच्या भूसंपादनाला वेग

प्रकल्पाचे आतापर्यंत ५५ टक्के भूसंपादन पूर्ण; २०२७ च्या मध्यावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास होणार सुरुवात?

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पातील भूसंपादनाला अखेर आता वेग आला आहे. आतापर्यंत ५५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत ७० टक्के भूसंपादन पूर्ण करून या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे 'एमएसआरडीसी'चे नियोजन आहे. त्यानंतर २०२७ च्या मध्यावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाण्याचीही शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 'एमएसआरडीसी'कडून १२८ किमी लांबीची, १६ मार्गिकांची विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प आधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) होता. पण २०२० मध्ये हा प्रकल्प 'एमएसआरडीसी'कडे आल्यानंतर महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविली, मात्र प्रकल्पाचा खर्च १९ हजार कोटींवरून थेट २६ हजार कोटींवर गेल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव तसेच भूसंपादनातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कर्जहमीचा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या दोन्ही प्रस्तावांना सरकारने काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळेच वर्षभरापूर्वी केवळ २० टक्के असलेले भूसंपादन आता ५५ टक्क्यांवर गेल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित असलेला विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. विरारपासून अलिबागपर्यंत विस्तारणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध शहरे, औद्योगिक क्षेत्रे आणि बंदरांना परस्परांशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे आणि इतर वाहतूक सुविधांचा समन्वय साधण्याची संकल्पना या प्रकल्पात आहे.

या मार्गिकेमुळे विरार, वसई, ठाणे, पनवेल, पेण आणि अलिबाग परिसरातील दळणवळण अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी कमी होण्याबरोबरच जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यांच्याशी जोडणी अधिक सुलभ होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १००० हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे.

पालघर, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यातील १०४ गावातून ही मार्गिका जाणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. येत्या काही दिवसांत ७० टक्के भूसंपादन पूर्ण करून बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर बांधकामास सुरुवात केली जाईल असे सांगितले जात आहे.

  • मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 'एमएसआरडीसी'कडून १२८ किमी लांबीची, १६ मार्गिकांची विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प आधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) होता. पण २०२० मध्ये हा प्रकल्प 'एमएसआरडीसी'कडे आल्यानंतर महामंडळाने निविदा प्रक्रिया राबविली, मात्र प्रकल्पाचा खर्च १९ हजार कोटींवरून थेट २६ हजार कोटींवर गेल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. औद्योगिक क्षेत्रांना मालवाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. पर्यटन, व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अलिबागसह पेण, पनवेल आणि परिसरातील विकासाला गती मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र, भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे वेळापत्रक अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT