रायगड: मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी आणि पालघर, ठाणे व रायगड या तिन्ही जिल्ह्यांना एकाच वेगवान सूत्रात बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या (विरार अलिबाग मल्टिमाेडल काॅरिडाेर) पहिल्या टप्प्याला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) विकसित करण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची एकूण लांबी १२९ किलोमीटरच्या आहे. हा प्रकल्प भविष्यातील औद्योगिक विकास, वाढते नागरीकरण आणि जेएनपीए बंदराशी होणारी मालवाहतूक लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकल्पाची विभागणी दोन प्रमुख टप्प्यांत करण्यात आली असून, या कॉरिडॉरचे अंतिम टोक अलिबाग असल्याने कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला त्यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
पहिल्या टप्प्याला मंजुरी
या प्रकल्पाचा मुख्य आणि सर्वात मोठा भाग असलेल्या नवघर ते बलावली या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादन आणि बांधकाम प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पहिला टप्पा सुमारे ९८ किलोमीटर लांबीचा असून, तो पालघर जिल्ह्यातील विरारजवळील नवघर येथून सुरू होणार आहे.
तेथून भिवंडी, कल्याण, पनवेल असा प्रवास करत हा महामार्ग थेट रायगड जिल्ह्यातील पेण जवळील बलावलीपर्यंत पोहोचेल. या मार्गावर मेट्रो मार्गिका, बससाठी स्वतंत्र मार्ग (बीआरटीएस) आणि बहुउद्देशीय वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहेत. हा टप्पा मुंबई-अहमदाबाद हायवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे यांना जोडणारा एक महत्त्वाचा अंतर्गत दुवा ठरणार आहे, ज्यामुळे मुंबई-ठाणे शहरात न जाता थेट रायगडमध्ये प्रवेश करणे शक्य होईल.
दुसरा टप्पा आणि प्रादेशिक विकास
प्रकल्पाचा दुसरा टप्पा पेण तालुक्यांतील बलावलीपासून सुरू होऊन थेट अलिबागपर्यंत जाणार असून त्याची लांबी सुमारे ३० किलोमीटर आहे. भौगोलिक रचनेचा विचार करता, पेण आणि अलिबागच्या दरम्यान वडखळ हे मुख्य जंक्शन येत असल्याने हा संपूर्ण मार्ग वडखळमार्गेच अलिबागला जोडला जाईल. या दुसऱ्या टप्प्यामध्ये पेण, वडखळ आणि अलिबाग या तिन्ही महत्त्वाच्या व्यापारी व पर्यटन क्षेत्रांचा समावेश होतो.
विरार-अलिबाग अंतर दोन तासांत
सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गावरून अलिबागकडे जाताना वडखळ आणि पेण परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे. मात्र, हा कॉरिडॉर थेट वडखळमार्गे अलिबागला जोडला जाणार असल्यामुळे, विरार ते अलिबाग हे अंतर अवघ्या दीड ते दोन तासांत कापणे प्रवाशांना शक्य होणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक रोजगार, पर्यटन आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला मोठी गती मिळू शकणार आहे.