रहदारीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे पाण्यात रास्ता रोको pudhari photo
रायगड

Raigad News : रहदारीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांचे पाण्यात रास्ता रोको

कलवे-दादर रस्त्यावर पाणीच पाणी, वर्दळही झाली बंद

पुढारी वृत्तसेवा

पेण : पेण तालुक्यातील कळवे - दादर रस्त्यावर ॲक्सिस बँकेसमोर पाणी साचते त्यामुळे ग्रामस्थांचा रहदारीचा रस्ता बंद होत असल्यामुळे कळवेसह इतर गावातील ग्रामस्थांनी बुधवारी पाण्यात बसून रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे साचलेल्या पाण्यात येथील ग्रामस्थांनी मासेमारी करून एक अनोखे आंदोलन केले.

कळवे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेल्या घरांमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसात येथे दोन-तीन फूट पाणी साचते. त्याचा परिणाम होऊन या रस्त्यावरून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होते. शालेय विद्यार्थी नोकरवर्गाला कामावर जाता येत नाही. तसेच ग्रामस्थांना खरेदीसाठी पेणला जाता येत नाही.

याबाबत कळवे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी तहसीलदार पेण सार्वजनिक बांधकाम खाते यांना लेखी निवेद्य देऊन रस्त्यावर करण्यात आली अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली आहे. मात्र वर्षभर याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी साचलेल्या पाण्यात बसून कळवे येथील ॲक्सिस बँकेसमोर ग्रामस्थांनी रस्त्यात ठिय्या मांडत रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

कलवे सरपंच सतीश पाटील, उपसरपंच राजश्री पाटील, माजी सरपंच निवास पाटील, सदस्य प्रमोद पाटील यांच्यासह सर्व सदस्य तसेच सोनखार ग्रामपंचायत सरपंच दिलीप म्हात्रे, जोहे उपसरपंच गणेश घरत, सदस्य काशिनाथ पाटील यांच्यासह कळवे, दादर, सोनखार, उर्नोली या गावातील तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते.

सोनखार सरपंच दिलीप म्हात्रे यांनी आमचा गणपती कारखाना विरोध नाही मात्र त्यांनी बांधकाम करताना पाणी जाण्याचे जे मार्ग बंद केले ते खुले करावेत. आमची वाहने बंद होता कामा नयेत अन्यथा यासंदर्भात आरटीओ कार्यालयाला पत्र देण्यात येईल. तसेच जर गरज पडली तर मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा बोलताना दिला.

संतप्त ग्रामस्थांनी पाणी जाण्याचे मार्ग जे कारखानदारांनी बंद केले आहेत ते तातडीने खुले करावेत अशी मागणी यावेळी जोर लावून धरली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल, पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी ग्रामस्थांचे समजूत काढत सदर बंद केलेले पाण्याचे नैसर्गिक मार्ग जेसीबी आणून खुले करण्यात आले.

तसेच जर का या कामात कुणी हस्तक्षेप केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी दिले. यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र जर का पुन्हा पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले तर यापेक्षा अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

अधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या तहसीलदार तानाजी शेजाल, पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता एम.डी. पाटील हे तातडीने कळवे येथे उपस्थित झाले. अप्पर पोलीस अधीक्षक विजय शिवतरे हेदेखील कलवे येथे आंदोलनस्थळी पोहोचले.

गेले वर्षभर आम्ही सार्वजनिक बांधकाम खाते व तालुका प्रशासनाकडे ॲक्सिस बँक रस्त्यावर करण्यात आलेल्या बांधकामाबाबत तक्रारी परंतु त्याकडे लक्षण दिल्याने आम्ही हे रास्ता रोको आंदोलन करत आहोत. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करून पाण्याचे नैसर्गिक निचरा होण्याचे बंद करण्यात आलेले मार्ग पुन्हा खुले करावे प्रशासनाने यात कडक भूमिका बजावावी अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल.
सतीश पाटील, कळवे सरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT