कर्जत : कर्जत-पाली तर्फे कोथळ-खलाटी ग्रा.पं. हद्दीत प्रस्तावित असलेल्या टोरेंट पीएसएच-३ जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांचा विरोध तीव्र होत आहे. कर्जत-पालीतील शिवमंदिर सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संजना बाळू पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रकल्पास तसेच संबंधित ४०० केव्ही ट्रान्समिशन लाईनला सर्वानुमते ठाम विरोध दर्शविण्यात आला.
ग्रामसभेत चर्चा झाल्यानंतर टोरेंट कंपनीकडून प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात येणारे सर्वेक्षण, भूसर्वेक्षण, ड्रिलिंग, ब्लास्टिंग, बोगदे, रस्ते, बांधकाम, ट्रान्समिशन लाईन, वनजमीन हस्तांतरण, जमीन संपादन, पाणी साठवण व्यवस्था तसेच प्रकल्पाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेली कार्यवाही ग्रामसभेच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय करण्यात येऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांच्या शंकांचे समाधान होईपर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या परवानग्या देऊ नयेत आणि प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ठरावातून करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या मते, सुमारे तीन हजार मेगावॅट क्षमतेचा आणि मोठ्या क्षेत्रावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प परिसरातील पर्यावरण, जैवविविधता, जलस्रोत, वनक्षेत्र, शेती आणि पारंपरिक उपजीविकेवर गंभीर परिणाम करू शकतो. प्रकल्पासाठी होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांचे नुकसान होण्याची तसेच गरोदर महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामसभेने आपल्या ठरावात स्पष्ट विरोध केला आहे तरीही, जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रामसभेचा ठराव तहसीलदार, आणि इतर संबंधित प्राधिकरणांकडे पाठविण्यात आला असून प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
धरण, पूररेषा, संभाव्य पूरक्षेत्र, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय परिणामांबाबतची महत्त्वाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांशी कोणतीही प्रभावी लोकसुनावणी न घेता प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. परिसरातील विद्यमान व प्रस्तावित जलसंपदा प्रकल्प तसेच भीमाशंकर अभयारण्याचा एकत्रित पर्यावरणीय परिणाम अभ्यासही झालेला नाही. शासनाने जनभावनेचा आदर करून हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी आम्ही केली आहे.प्रसाद देशमुख, अध्यक्ष, ग्रामसंघर्ष समिती पाली
टोरंट पॉवरच्या सार्वजनिक नोटिसमध्ये रूट अलाइनमेंट, टॉवर लोकेशन आणि ट्रान्समिशन कॉरिडॉरची माहिती उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला असला तरी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष व ई-मेलद्वारे वारंवार मागणी करूनही ती माहिती देण्यात आलेली नाही. हा मुद्दा २ जून रोजी तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या जनसुनावणीतही मांडण्यात आला होता. त्यामुळे नोटीस दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत ग्रामसभेने चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण माहिती उपलब्ध होईपर्यंत प्रकल्पासंदर्भातील कोणतीही पुढील कार्यवाही मान्य नसल्याची भूमिका ग्रामसभेने घेतली असून यापूर्वीचे स्थगिती ठराव कायम ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे.विकास देशमुख, सचिव, ग्रामसंघर्ष समिती पाली