Ratnagiri News : आंजर्लेत भूमिगत वीज प्रकल्प कामामुळे ग्रामस्थ त्रस्त

महावितरण व ठेकेदाराच्‍या निष्‍काळजी कारभाराविरोधात नागरिकांतून तीव्र संताप
Ratnagiri News
दापोली : पावसाळ्याच्या तोंडावर गटारात पडून असलेले केबल ड्रम आणि पाईप.
Published on
Updated on

दापोली : आंजर्ले ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पाच्या संथ व नियोजनशून्य कामकाजामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महावितरण कंपनी आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

२०२० मधील निसर्ग चक्रीवादळानंतर किनारपट्टी भागातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प हाती घेतला. त्याअंतर्गत आंजर्ले गावात काही महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र नागरिकांच्या सुविधांचा विचार न करता सुरू असलेल्या या कामामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावातील अनेक रस्ते खोदून अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले असून काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मुर्डी परिसरातील रस्त्यांची केवळ वरवरची दुरुस्ती करण्यात आली. आजही अनेक ठिकाणी केबल ड्रम, सिमेंट पाईप व इतर साहित्य गटारांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी टाकून ठेवण्यात आले आहे.

पावसाळा सुरू झाल्याने या साहित्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा खोळंबण्याची भीती व्यक्त होत आहे. उभागर-कोपरी परिसरातील मुख्य गटारात केबल ड्रम व पाईप टाकल्याने रस्त्यावर पाणी साचण्याचा आणि नागरिकांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच परिसरात माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास शाळा बंद ठेवण्याची वेळ आली तर त्याची जबाबदारी महावितरण आणि ठेकेदार स्वीकारणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

या समस्यांबाबत ग्रामपंचायतीने महावितरणकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या सुरक्षेकडे व मूलभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news