नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना ताजी असताना, आता थेट चॉपर, कोयता व बंदूक घेऊन घरात घुसून एका कुटुंबावर बंदुकीचा धाक दाखवत हल्ला करण्याची घटना ही धाकटे वेणगाव येथे घडली आहे. यामध्ये कुटूंबातील चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या अशा घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे मात्र कर्जत तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र लोकांमधून उपस्थित केला जात आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील दसऱ्याच्या आदल्या रात्री 1ऑक्टोबर रोजी मोजी पोटलवाडी येथे गोळीबाराची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास धाकटे वेणगाव येथील राहाणार शिंदे कुटूंबाच्या घराचा दरवाजा तोडून हातामध्ये चॉपर, कोयता व बंदूक घेऊन थेट घरात घुसुन कुटूंबियांवर बंदुकीचा धाक दाखवून चॉपर व कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या हल्ल्यात प्रतीक ऊर्फ छोटू प्रफुल्ल शिंदे, वय वर्ष 28 आणि त्याचा भाऊ सतिश शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांचे वडील प्रफुल्ल शिंदे आणि आई प्रतिभा शिंदे देखिल जखमी झाल्या आहेत. तर हल्ल्या दरम्यान परिसरात आरडाओरड झाली असता, या हल्ल्यातील आरोपी हे काळ्या रंगाच्या किया सोनेट कारमध्ये बसून पळून गेल्याची माहीती समोर येत आहे.
सदर घटनेची माहिती ही कर्जत पोलिसांना मिळताच तात्काळ कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लटपटे व पोलीस टीमसह फॉरेन्सिक टीम दाखल होऊन घटनास्थाळाची पाहणी करून हल्ल्यात वापरण्यात आलेला पोलिसांनी चॉपर, कोयता व बंदूक ताब्यात घेतले आहेत. या घटसंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास हा कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक लटपटे या करीत आहे. तर आधी गोळीबारा सारखा गंभीर गुन्ह्या ताजा असताना, थेट चॉपर, कोयता व बंदूक घेऊन घरात घुसून एका कुटुंबावर बंदुकीचा धाक दाखवत हल्ल्याच्या घटनेमुळे मात्र कर्जत तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र लोकांमधून उपस्थित केला जात आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला आरोपी किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव, रा. धाकटे वेणगाव व जय सुनिल साबळे, रा. करंजाडे, पनवेल आणि त्यांच्या सोबतचे दोन अनोळखी इसम यांनी केला असल्याचे व हा हल्ला दोन सख्ख्या चुलत भावांतील वादातून उद्भवला असल्याची शक्यता तसेच किरकोळ वाद हा विकोपाला जाऊन दोन्ही कुटुंबांमध्ये वैर निर्माण होऊन हा जीवघेणा हल्ला घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या घडलेल्या घटनेमुळे धाकटे वेणगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटसंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.