

डोळखांब : शहापूर तालुक्यातील ग्रामिण भागातील जंगलात किंवा मानव वस्तीत एरव्ही बिनधास्त पणे वावरणारे बिबटे सद्या स्थलांतरित झाल्याने अचानक दिसेनासे झाल्याचे दिसून येत आहेत.
शहापूर तालुक्यातील डोळखांब, चोंढे,आजोबा देवस्थान, खराडे, साठगाव सारंगपुरी किंवा वाशाळा, तानसा, खर्डी, तानसा अभयारण्य, वाशाळा याठिकाणी मिळून जवळपास पंधरा ते सोळा बिबट्यांची वर्दळ असल्याची वनविभागाची अधिकृत माहिती होती. परंतु गेल्या दीड महिन्यापासून या बिबट्यांचा धुमाकुळ मंदावला असून हे बिबटे अचानक स्थलांतरीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यापूर्वी परंपरागत मार्गाने शहापुरातील ग्रामिण भागात मोठ्याप्रमाणात बिबट्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे वनविभागाची डोकेदुखी देखील वाढली होती. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे पाळीव श्वान, कोंबड्या, बकऱ्या तसेच गोठ्यातील जनावरे या बिबट्यांनी फस्त केली होती. काही ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर देखील हल्ले झाले होते. परंतु हे नागरिक सुदैवाने बचावले. जंगल संरक्षणाचे दृष्टीने बिबट्याचे जंगलात वावरणे हिताचे असले तरी मानवावर हल्ले केल्यानंतर मानव संरक्षणाचे मोठे आवाहन वनविभागापुढे उभे राहाते. मात्र हा सर्व त्रास गेल्या दीड महिन्यापासून बंद झाल्यामुळे नागरिकांनी तसेच वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अस्तित्वावर दुष्परिणाम
अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असलेला हा बिबट्या वातावरणातील नैसर्गिक बदल किंवा जंगलातील खाद्य कमी झाल्याने तसेच जंगलालगत असलेल्या शेतांवर पावसाळ्यामुळे शेती कामासाठी समुहाने मानवाचा वावर वाढला असल्याने त्याचप्रमाणे मोकाट जनावरांचा जंगलातील वावर कमी झाल्याने कळत नकळत बिबट्याच्या अस्तित्वावर त्याचा दुष्परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
खाद्य कमी झाल्याने स्थलांतर
सद्या घाटमाथ्यावर होणाऱ्या पर्जन्यवृष्टीच्या तुलनेत शहापूर तालुक्यामध्ये मे महिन्याच्या 6 तारखेपासून संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. तसेच जंगलातील इतर प्राण्यांचेही स्थलांतर झाल्यामुळे बिबट्याचे खाद्य कमी झाल्याने तालुक्यातून बिबटे दिसेनासे झाले आहेत. बिबट्यांनी स्थलांतर केल्याचे दिसत आहेत.