पेण अर्बन बँक ठेवीदारांचे आंदोलन चिघळणार Pudhari Photo
रायगड

Urban Bank Depositors Protest | पेण अर्बन बँक ठेवीदारांचे आंदोलन चिघळणार

चौथ्या दिवसानंतरही आंदोलन सुरू; शासनाने दखल न घेतल्यास आत्मत्याग करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कर्जत : पेण अर्बन बँक ठेवीदारांना चौदा वर्षात न्याय मिळाला नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी मिळवुन देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात येणार्‍या निवडणुका पहात पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

बुडीत पेण अर्बन बँक प्रकरण ऐन निवडणुकीच्या काळात चांगलेच तापले आहे. रायगड जिल्ह्यातील मध्यमवर्गीयांना देशोधडीला लावणार्‍या पेण अर्बन बँक ठेवीदारांना चौदा वर्षात न्याय मिळाला नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान 7 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत येथे आपल्या भाषणात पेण अर्बन बँक संदर्भात संबधीत विभागाला निर्देश दिले असल्याचे सूतोवाच केले होते. मात्र अद्यापही यावर तोडगा न निघाल्याने अखेर ठेवीदारांनी लाक्षणिक आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास प्रसंगी विष प्राशन करून आत्मत्याग करणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण को ऑपरेटिव्ह अर्बन बँक 23 सप्टेंबर 2010 रोजी बंद पडली. त्यामुळे गेल्या 14 वर्षापासून पेण बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 58 हजार 280 ठेवीदार यांचे 610 कोटींच्या ठेवी बुडीत निघाल्या. सन 2010 पासून सन 2024 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत अनेक पक्षाच्या सरकारने अनेक पक्षातील नेत्यांनी व अनेक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पेण अर्बन बँक ठेविदारांना ठेवी मिळवून देण्याची आश्वासने दिली आहेत. मात्र एकाही पक्षाच्या सरकारने व नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे पेण बँक संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने 30 सप्टेंबरपासून कर्जत लोकमान्य टिळक चौक येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

गेले तीन दिवस ठिय्या आंदोलन झाले असून दखल न घेतल्याने साखळी आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. साखळी आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास बेमुदत आमरण उपोषण आणि बेमुदत आमरण उपोषणाची दखल न घेतल्यास विष प्राशन करून आत्मत्याग करणार असे आंदोलनाचे स्वरूप असणार आहे.

पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी रमेश शांताराम कदम तसेच पेण बँक संघर्ष समितीचे सचिव चिंतामण पाटील, प्रदीप शहा, मोहन सुर्वे यांसह इतर पदाधिकारी आणि ठेवीदार उपोषणास बसले आहेत. ठेवीदारांना पाच लाखाचा विमा कवच आणि मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्यावेत या मुख्य मागणीसह इतर मागण्या घेऊन ठेविदारांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मालमत्ता विकून पैसे द्या

गेल्या 14 वर्षापासून पेण बँकेचे रायगड जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 58 हजार 280 ठेवीदार यांचे 610 कोटींच्या ठेवी बुडीत निघाल्या. ठेवीदारांना पाच लाखाचा विमा कवच आणि मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे द्यावेत या मुख्य मागणीसह इतर मागण्या घेऊन ठेविदारांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

7 कोटींची वसुली

उच्च न्यायालयाने 10 हजार व 25 हजारच्या ठेवीदारांना पैसे देण्याचे आदेश दिलेले होते. असे ठेवीदार 1 लाख 37 ठेवीदार आहेत. त्यापैकी फक्त सुमारे 27 हजार ठेवीदारांना सुमारे 13 कोटींचे वाटप झाले आहेत तर घोटाळ्यातील 598 कोटींपैकी 7 कोटी वसुल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT