Raigad News | रायगड जिल्ह्यात नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या चुरशीच्या लढती

रायगड जिल्ह्यात नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या चुरशीच्या लढती
Assembly Election 2024
रायगड जिल्ह्यात नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या चुरशीच्या लढती file photo
Published on
Updated on
जयंत धुळप, रायगड

रायगडमधील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, पेण, कर्जत, पनवेल आणि उरण या सात विधानसभा मतदार संघात प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत. महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आणि राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने महिला उमेदवार स्नेहल जगताप यांना उतरवण्याचे ठरवले आहे. तर पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात शेकापच्या चित्रलेखा पाटील उमेदवार म्हणून ठाकतील, असे जवळपास नक्की आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून काका अनिल तटकरे वा चुलतभाऊ अवधूत तटकरे असा नात्यातच सामना रंगण्याची शक्यता आहे.

महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंची नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली असून, त्यातून महाडमधील शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. मात्र, त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप उभ्या ठाकणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यामागे महाडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांचे मोठे वलय आहे आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना या मतदार संघात अपेक्षित मताधिक्य मिळवून देणे आमदार गोगावले यांना शक्य इराले नव्हते. परिणामी, महाडमध्ये मोठ्या चुरशीची लढत होणार आहे.

पनवेल विधानसभा मतदार संघात महायुतीतील भाजपचे प्रशांत ठाकूर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील मैदानात येणार आहेत. शेकाप, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसचे या मतदार संघात हक्काचे मतदार आहेत; पण गेल्या दहा वर्षात भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणून केलेली विविध विकास कामे आणि सातत्याने केलेले लोकोपयोगी उपक्रम यामुळे भाजपने येथील मतदार वाढवण्यात यश मिळविले आहे. यामध्ये विमानतळ, सिडकोच्या माध्यमातून होत असलेला विकास ही त्यांची जमेची बाजू आहे. दरम्यान, विविध प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले प्रश्न, सरकारविरोधातील नाराजी, विमानतळ नामांतरण या मुद्दांना महाविकास आघाडीकडून मोठी उचल दिली जाऊ शकते. एकूणच आमदार प्रशांत ठाकूर यांना शेकापचे बाळाराम पाटील यांना 'कॉटे की टक्कर' द्यावी लागणार आहे.

अलिबाग विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात शेकापच्या चित्रलेखा पाटील उमेदवार म्हणून ठाकतील, असे जवळपास नक्की आहे. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी सद्यस्थितीत अलिबागमधील जिल्हा परिषद मतदार संघनिहाय महिलांचे मेळावे घेऊन कामाला केलेली सुरुवात मिळत असलेला प्रतिसाद पाहता या मतदार संघातदेखील 'कॉट की टक्कर'च अपेक्षित आहे. बुळप आणि त्या मेळाव्यांना श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार देण्याचे नियोजन आहे. यामध्ये आदिती तटकरे यांचे काका अनिल तटकरे आणि चुलतभाऊ अवधूत तटकरे यांची नावे समोर येत आहेत, दरम्यान, या मतदार संघात खासदार सुनील तटकरे यांचा मोठा प्रभाव आहे. त्याचबरोबर या मतदार संघात आणलेला मोठा निधी आणि केलेली विकासकामे ही आदिती तटकरे यांची जमेची बाजू आहे. मात्र, या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे बारीक लक्ष असल्याने येथे नेमकी लढत कशी होणार, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. उरण विधानसभा मतदार संघात भाजपचे आ. महेश बालदी यांच्या विरुद्ध शेकापचे प्रीतम म्हात्रे लढण्यास सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. मनोहर भोईर आणि काँग्रेसचे महेंद्र घरत यांनीही चंग बांधला आहे. या परिस्थितीत नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार, यावर प्रत्यक्ष लढत अवलंबून राहणार आहे.

महाविकास आघाडीने येथे उमेदवार निश्चित केल्यावर एकदिलाने टक्कर दिली, तर आमदार बालदींसमोर मोठे आव्हान उभे राहील, हे मात्र नक्की आहे. पेणमध्ये विद्यमान आ. रवींद्र पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता आहे. या मतदार संघातून शेकाप प्रमोद ऊर्फ पिंट्याशेट पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन हे असणार अशी चर्चा असतानाच, आपण निवडणूक लढवणार नाही, असे किशोर जैन यांनीच सांगितले. दरम्यान, शेकापमधून भाजपमध्ये आल्यावर माजी आ. धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर खासदार म्हणून झालेली बिनविरोध निवड ही येथे भाजपची मोठी जमेची बाजू झाली आहे. त्यातून भाजपची ताकद सध्या पेणमध्ये वाढलेली दिसून येत आहे.

कर्जत विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने महायुतीत धुसफुस सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनीदेखील चंग बांधला आहे. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांना कडवी लढत द्यावी लागणार, असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news