उरण : मागील 20 महिन्यांत उरण परिसरात 6 हजार 443 नागरिकांना कुत्र्यांनी प्रसाद दिला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 3 हजार कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या.त्यात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या आकडेवारीवरून कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एकंदरीत महिन्याकाठी सरासरी 300 श्वान दंशाच्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.तरी उरण शहरातील व ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात 2024 ते 2025 या वर्षातील 20 महिन्यांतच परिसरातील 6 हजार 443 श्वान दंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात येत आहे.
तसेच कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयातील श्वान दंशाच्या रुग्णांचा यात समावेश नाही.तसेच कुत्रा चावल्यानंतर काही नागरिकांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने श्वान दंशाच्या रुग्ण दगावले असल्याची माहिती ही समोर येत आहे.तरी उरण तालुक्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
टाकावू पदार्थ टाकण्याचे प्रकार वाढले
उरण शहर व परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील गावात दिवसेनदिवस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यातच परिसरात चिकन, मासळी,मटणाची दुकानेही झपाट्याने वाढत असल्याने सदरची कुत्री ही त्याठिकाणी टाकावू पदार्थ खाण्यासाठी तुटून पडतात.त्यात काही कुत्री ही नागरिकांवर हल्ला करुन चावा घेत आहेत.तसेच मोटारसायकलस्वार यांच्या मागून धावत जाऊन त्यांच्या वर हल्ला केल्याची घटना समोर येत आहे.त्यामुळे श्वान दंशाच्या घटनेत वाढ होत आहे.