उरण: नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या पोर्ट लाईनवरील उरण रेल्वे स्थानकातील अंडरग्राउंड (भुयारी) मार्गात आज पुन्हा एकदा पावसाचे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली आहे. मागील वर्षीच्या अनुभवातून रेल्वे प्रशासनाने कोणताही धडा न घेतल्याने आज पुन्हा एकदा प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
प्रशासनाने खबरदारी म्हणून आणलेले पाण्याचे पंप केवळ 'दिखावा' ठरल्याने रेल्वे आणि केंद्र सरकारच्या कामांमधील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. या परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाची कमालीची धावपळ उडाली, तर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
उरण रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर मागील वर्षीच्या पावसाळ्यातही या स्थानकाच्या अंडरग्राउंड भागात ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यावेळी तरुणांनी स्थानकात पोहण्याचा आनंद लुटल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराची पोलखोल झाली होती.
या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना किंवा संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी यंदा केवळ पाणी उपसण्यासाठी मोठे पंप सज्ज ठेवले होते. मात्र, आज झालेल्या पावसात हे पंपही कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज सुरूवातीलाच आलेल्या पावसामुळे उरण स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचले. स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या साचलेल्या गढूळ पाण्यातूनच वाट काढावी लागली.
रेल्वेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या आधुनिक स्थानकाची पहिल्याच काही पावसात अशी दुरवस्था झाल्याने केंद्र सरकारच्या आणि रेल्वेच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मोठ्या भरतीच्या वेळी पाऊस पडला तर स्टेशनच्या भूयारी मार्गात पाणी साचते असा दावा रेल्वे कडून करण्यात येत होता मात्र आत्ता कोणतीही भरती नव्हती आणि थोड्या पावसातच रेल्वे ठाण्यात पाणी साचले होते.
स्थानकात पाणी साचल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांची आणि प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असले, तरी पाण्याचा निचरा योग्य गतीने होत नव्हता. या संदर्भात उरण रेल्वे स्टेशन मॅनेजर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते स्थानकातील पाणी बाहेर काढण्याच्या कामात आणि व्यवस्थापनात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर खर्च केला जातो, मग उरण स्थानकातील पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी भुयारी मार्गिका किंवा ड्रेनेज सिस्टीम का उभारली गेली नाही? रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जिवाशी आणि सोयीशी अशी किती दिवस खेळणार, असा संतप्त सवाल आता उरणकर विचारत आहेत.