कोप्रोली (उरण) ः अटलसोतू मार्ग बनण्यापासून मुंबई अगदिच हाकेच्या अंतरावर आली असल्याने मुंबई प्रवास हा फक्त 20 मिनिटांवर येऊन ठेपला आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उरण ते मुंबई दरम्यानच्या बेस्ट बस सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. यादरम्यान वातानुकूलित बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर वांद्रे आणि वाशी दरम्यान सेवा सुरू करण्यात झाली आहे.
तर, येत्या काही दिवसांत अटलसेतूमार्गे उरणच्या सिडको ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान बेस्टची चलो मोबिलिटी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याने उरणकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. जानेवारी 2024 मध्ये मुंबई आणि नवीमुंबईला जोडणाऱ्या अटलसेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे, मुंबई ते नवीमुंबई हे अंतर अवघ्या काही मिनिटांवर आल्याने अटलसेतूमार्गे उरण बससेवा सुरू करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होती.
त्यातच, उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर, उरण ते नवीमुंबई दरम्यान रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्याने ही सेवा मुंबई,ठाणेपर्यंत वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. परंतु, या मागणीसंदर्भात अनेकवेळा आश्वासन मिळाले आहे.
उरणहून मुंबईला जाण्यासाठी भाऊचा धक्का ते मोरा दरम्यान प्रवासी लाँचसेवा सुरू असून या सेवेला अनेकदा भरती ओहोटीचा आणि पावसाळ्यात हवामानाचा फटका बसतो, असे प्रवासी मुकेश थळी यानेसांगितले. तर, उरण ते दादर दरम्यान सुरू असलेल्या एसटी बससेवेमुळे नवीमुंबई मार्गे सुमारे दीड ते दोन तासांचा अवधी लागतो.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून प्राथमिक स्तरावर उरणमधील सिडको (जेएनपीटी) - नेरुळ मार्गे वांद्रे पूर्व रेल्वेस्थानक या मार्गावर एस - 188 आणि सिडको (जेएनपीटी) ते मानखुर्द (वाशी) या मार्गावर एस-189 ही बेस्ट अंतर्गत चलो मोबिलिटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही दिवसांत जेएनपीटी वसाहतीजवळील सिडको (जेएनपीटी) ते वर्ल्ड ट्रेंड सेंटर-मंत्रालय (अटलसेतू मार्गे) या मार्गावर एस- 190 क्रमांकाची बससेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उरण येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
एस 188(एसी) --सिडको टाऊनशीप बांद्रा रेल्वे स्थानक पूर्व ... (जासई / गव्हाण फाटा / उरण फाटा / वाशी हायवे / प्रियदर्शनी / बीकेसी / बांद्रा स्थानक)...एस-189... सिडको / मानखुर्द जकात नाका (वाशी) ... जासई / गव्हाण फाटा/ उलवे/बेलापूर/ अपोलो / उरण फाटा / नेरूळ /जुईनगर/ सानपाडा ब्रिज / वाशी हायवे ). 9:30ते 12:30. 150 रुपये तिकीट...एस 190. सिडको / वर्ल्ड ट्रेंड सेंटर (मुंबई) /मंत्रालय मार्गे .... (सिडको जेएनपीटी / नवघर फाटा/धुतुम/ चिर्ले / अटलसेतु/ सी एस सी/ मंत्रालय मार्गे वर्ल्ड ट्रेंड सेंटर).
या बसने प्रवास करण्यासाठी ’चलो ॲप’ वर ऑनलाइन बुकिंग करूनच यामध्ये प्रवास करता येणार आहे. तर, उरणहून सुरू होणाऱ्या या बसची सेवा ही सकाळी 7.30 आणि 8 वाजता मुंबईतील वांद्रे आणि मानखुर्द -वाशीसाठी बस सुरू करण्यात आली आहे. तर, या तिन्ही मार्गावरील प्रवासासाठी किमान 100 ते 200 रुपये प्रवास खर्च करावा लागणार आहे.