खांदा कॉलनी: उरण नाका येथील पुलावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते.
उरण नाक्यावर मोठ्या घाऊक बाजारपेठेतील दुकाने तसेच मच्छी मार्केट असल्याने या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. नवी मुंबईची परिवहन सेवाही या मार्गावरून सुरू असल्याने कोंडीत आणखी भर पडते.
दरम्यान, उरण नाका पुलाच्या पुढील मार्गावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहतूक वाढत आहे.
भविष्यात विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यास या पुलावर वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेकडून गाढी नदीवर नवीन पुलाची उभारणी करण्यात येत आहे. या पुलामुळे पनवेल आणि करंजाडे परिसर थेट जोडला जाणार आहे.
सुमारे २१० मीटर लांबीच्या या पुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. नव्या पुलामुळे उरण नाका पुलावरील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे उरण नाका परिसरातील वाहतूक कोंडीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पनवेल शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, नवीन वसाहतींसोबत वाहनांची संख्याही वाढत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले असून या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचा विचार करून पर्यायी मार्ग विकसित करणे आवश्यक ठरत आहे. गाढी नदीवरील हा पूल त्यादृष्टीने महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पनवेल-करंजाडे प्रवासासाठी नागरिकांना आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने वेळेचीही बचत होण्याची अपेक्षा आहे. पुलाच्या कामाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
नवा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर उरण नाका परिसरातील कोंडी काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विमानतळाच्या पार्श्वभूमीवर या पुलाचे महत्त्व भविष्यात आणखी वाढणार आहे. महानगरपालिकेने पुलाचे काम गतीने पूर्ण करून तो लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.